जळगाव : हुंड्यासाठी होणारा छळ, गर्भपातासाठीचा दबाव आणि कौटुंबिक त्रास या सगळ्यांना कंटाळून जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात एका पाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रज्ञा चेतन शेळके (वय २२) असं या तरुणीचं नाव असून तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूपूर्वी प्रज्ञाने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात तिने आपल्या पतीसह सासू, सासरे आणि सासरच्या मंडळींवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. पाच महिन्यांचा गर्भ पोटात असतानाही गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत असल्याचे, तसेच विरोध केल्यावर मारहाण झाल्याचे तिने स्पष्ट केलं आहे.
सुसाईड नोटमध्ये प्रज्ञाने लिहिलं आहे की, “माझ्यामुळे माझे आई-वडील टेन्शनमध्ये आहेत, म्हणून मी आयुष्य संपवत आहे.” तिच्या या शब्दांनी माहेरच्यांचा हृदयद्रावक आक्रोश उफाळून आला आहे.
या घटनेने काही महिन्यांपूर्वी पुण्याजवळच्या गावात हुंड्यासाठी छळ सहन न करता आत्महत्या केलेल्या वैष्णवी गहवणेची आठवण ताजी झाली आहे. राज्यात या घटनेचे पडसाद अद्याप उमटत असतानाच जळगावमध्ये अशा प्रकारची आणखी एक शोकांतिका घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. समाजातील हुंडा आणि कौटुंबिक छळामुळे पुन्हा एक निरपराध जीव गेला, या घटनेने सर्वत्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
read also :https://ajinkyabharat.com/dashavatar-pahoon-uddhav-thakaranchi-response/