हिरपूर जयाजी महाराज मंदिरात आनंदराव गणोरकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

जयाजी महाराज

हिरपूर (प्रतिनिधी):
हिरपूर येथील ऐतिहासिक जयाजी महाराज मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने सेवा करणारे आनंदराव गणोरकर यांचा ७५ वा वाढदिवस अर्थात अमृतमहोत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मंदिर संस्थान तसेच हिरपूर–सांजापूर येथील गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक संजय फडनाइक होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाचे माजी जिल्हा नियोजन अधिकारी वसंतराव आंबेकर उपस्थित होते. यावेळी मंदिर संस्थानचे पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक आणि आनंदराव गणोरकर यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समारंभात आनंदराव गणोरकर यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी जयाजी महाराज मंदिराच्या स्वच्छता, देखभाल, दैनंदिन पूजा-अर्चा, धार्मिक विधी तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये अत्यंत निस्वार्थपणे योगदान दिले आहे. कोणत्याही अपेक्षेविना केलेली ही सेवा मंदिराच्या परंपरेचा अविभाज्य भाग ठरली असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Related News

आपल्या मनोगतात मान्यवरांनी गणोरकर यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करत, “समाज आणि देवस्थानासाठी निस्वार्थपणे काम करणारी माणसे ही समाजाची खरी संपत्ती असतात. तरुण पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी,” असा संदेश दिला.

अमृतमहोत्सवी सोहळा हा केवळ वैयक्तिक सत्कार न राहता स्वच्छता, सुशोभीकरण, भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला. संपूर्ण कार्यक्रम शांततामय, भावनिक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

Related News