मलकापूर : छत्तीसगड येथील अमित बघेल या व्यक्तीने सिंधी समाजाचे आराध्य दैवत साई झुलेलाल यांच्यासह इतर धर्मगुरूंविषयी केलेल्या आक्षेपार्ह व निंदनीय वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मलकापूर येथील सिंधी समाज बांधवांसह विविध समाजातील नागरिकांनी एकत्र येत आज दिनांक ३ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमित बघेल या व्यक्तीच्या वक्तव्याने सिंधी समाजासह सर्व समाजांच्या भावना दुखावल्या असून, अशा प्रकारच्या निंदनीय कृत्याचा कठोर निषेध करण्यात येतो. संबंधितावर कायदेशीर कठोरात कठोर कारवाई करून त्याला शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाद्वारे समाजाच्या श्रद्धास्थानांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर पावले उचलावीत आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन सादर करताना मा. नगराध्यक्ष नारायणदास निहालाणी, समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक भाई अशांत वानखेडे, नगरसेवक राजू पाटील, अरुण अग्रवाल, सुहास चवरे, मुकेश ललवानी, विनोद राजदेव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद जाधव, शहराध्यक्ष चेतन जगताप, अनिल आहूजा, विशाल माधवानी, डॉ. सुभाष तलरेजा, राकेश तलरेजा, नितीन उधानी यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते.
read also : https://ajinkyabharat.com/actress-daya-dongre-passes-away/
