मुंबई – लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील दहीहंडी उत्सवात आपल्या धमाकेदार परफॉर्मन्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मागाठाणे येथे झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात गौतमीच्या नृत्यावर प्रेक्षकांसह महिलांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
यानंतर तिने मुंबईकरांच्या प्रेमाबद्दल भावना व्यक्त केल्या आणि अलका कुबल यांच्यासोबत विमानतळावर झालेल्या खास भेटीचाही किस्सा सांगितला.
विमानतळावर अलका कुबल यांची भेट
गौतमी पाटील म्हणाली, “अलका ताई आणि मी विमानतळावर भेटलो होतो. आमच्यात खूप छान गप्पा झाल्या. फ्लाईट लेट असल्याने बराच वेळ आम्ही बोलत बसलो.
त्या म्हणाल्या, ‘व्हिडिओत पाहिल्यावर समजत नाही की तू किती गोड आहेस.’ त्यांनी मला खूप प्रेम दिलं, समजावून सांगितलं. महिलांचं खूप प्रेम मला मिळतंय.”
सलग कार्यक्रमांचा थकवा
गौतमी पुढे म्हणाली, “मी मुंबईतील कार्यक्रमांमुळे कंटाळले नाही, पण शारीरिक ताकद उरलेली नाही. सकाळपासून मी आणि माझा स्टाफ जेवणही केलेलं नव्हतं.
पुण्याहून सकाळी 6 वाजता निघाले आणि दिवसभर सलग कार्यक्रम झाले. आम्ही जवळपास 25 जण एकत्र फिरतो. मुंबईकरांचं प्रेम मात्र थकवा विसरायला लावतो.”
दहीहंडी म्हणजे खास उत्सव
प्रत्येक वर्षी दहीहंडीची आतुरतेने वाट पाहते, असं सांगताना गौतमी म्हणाली, “दरवर्षी काय नवीन करता येईल, याचा विचार मी करते.
यंदा नवीन हिंदी-मराठी गाण्यांचा पॅच सादर केला. प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला.”
चित्रपटात अभिनयाची तयारी
डान्स हेच आपलं पहिले प्रेम असल्याचं सांगत गौतमी पाटील म्हणाली, “इथून पुढे जर चित्रपट मिळाले तर मी नक्कीच अभिनय करेन.
यापूर्वी संधी आल्या होत्या पण मी लक्ष दिलं नव्हतं. मात्र आता अभिनय करण्यासाठी उत्सुक आहे. सध्या माझी अनेक गाणी येत आहेत.
सिद्धार्थ जाधवसोबतही गाणं केलं असून काही चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड केली आहेत.”
Read also : https://ajinkyabharat.com/sarfaraz-khancha-tadakhbaz-sutkane-mumbai/