औषध निरीक्षकांच्या कारवाईत मोठा मुद्देमाल जप्त
अकोला (प्रतिनिधी) – अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत अकोट शहरातील टावरी मेडीकोज या औषध
विक्री केंद्रातून गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची अवैध विक्री उघडकीस आली आहे. या कारवाईत जप्त झालेल्या औषधांचा साठा
आणि पाचशे रुपयांच्या दोन नोटा असा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषणानंतर आणि नागपूर येथील प्रयोगशाळेच्या अहवालावरून अकोट शहर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने औषध विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासन अकोला विभागाचे औषध निरीक्षक मनिष विश्वासराव गोतमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून २०२५ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक
कार्यालयाकडून मिळालेल्या पत्रात अकोट येथील टावरी मेडीकल स्टोअर्सकडून गर्भपाताच्या गोळ्यांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
यानंतर ३ जुलै २०२५ रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री भुईभार, विधी समुपदेशक अॅड. शुभांगी ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक जाधव, दोन पंच आणि औषध निरीक्षकांच्या पथकाने अकोट येथे धाड टाकली.
बनावट ग्राहकाला पाचशे रुपयांच्या दोन नोटा देऊन औषध खरेदीसाठी पाठविण्यात आले.
दुकानातील विक्रेते श्रीमती संगिता बेलसरे यांनी ग्राहकाला एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले.
त्यानंतर ठरल्याप्रमाणे एक व्यक्ती येऊन वर्तमानपत्रात गुंडाळलेली पुडी ग्राहकाला दिली.
त्या पुडीत चार लांबट पांढऱ्या गोळ्या आणि एक गोल पांढरी गोळी असल्याचे पंचासमक्ष स्पष्ट झाले. बदल्यात दिलेल्या नोटा पंकज टावरी यांनी स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान नमुना गोळ्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या. उर्वरित साठा आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
दुकानमालक बिपिन टावरी यांना औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.
१८ जुलै २०२५ रोजी नागपूर प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालात, जप्त गोळ्यांमध्ये गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांचे अस्तित्व सिद्ध झाले आहे.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन तसेच अकोट शहर पोलीस पुढील तपास करत असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/jugar-adyavar-dhad-86-thousands/
