अकोट- श्रावणातील चौथा सोमवार आणि त्यानिमित्त अकोट शहरात निघालेली भव्य कावड शोभायात्रा उत्साहात व शांततेत संपन्न झाली.
या यात्रेत तब्बल २४ कावड मंडळांचा सहभाग होता. खास म्हणजे यावर्षीच्या कावड यात्रेमध्ये महिला डीजे ऑपरेटरवर बंदी घालण्यात आली होती.
काल दुपारपासूनच शहरातील मंडळांनी अनवाणी पायाने पूर्णा नदीचे पवित्र जल कळशीत आणले होते.
सोमवारी सकाळी शहराच्या सीमेवर दाखल होताच कावड बांधणीस सुरुवात झाली. मार्गावर पालख्यांचे स्वागत, शिवभक्तांसाठी फराळाचे
स्टॉल्स व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
यात्रेदरम्यान अश्लील गाणी वा डायलॉग वाजवण्यास बंदी घालण्यात आली. “शिवकावड उत्सवासंबंधीची गीतेच वाजवावीत” अशी स्पष्ट नियमावली कावड
उत्सव समिती अध्यक्ष अनंत मिसाळ यांनी मंडळांना दिली होती.
पोलिस प्रशासनाची सज्जता :
यात्रेसाठी पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त उभारला होता.
अर्चित चांडक (अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या नेतृत्वात १० पोलीस अधिकारी, ९७
पोलीस कर्मचारी, ६० गृहरक्षक दल, १ एसआरपी प्लाटून, १ आरसीपी प्लाटून, सीसीटीव्ही व्हॅन तसेच ट्रेकिंग फोर्स तैनात करण्यात आले होते.
सकाळी ७ वाजता सुरू झालेली ही भव्य शोभायात्रा रात्री १० पर्यंत अकोला नाका, जवाहर मार्ग, नरसिंग महाराज रोड, यात्रा चौक, सोमवार वेस, जयस्तंभ चौक, टाकपुरा मार्गे
तपेश्वरी महादेव मंदिरात पोहोचून जलाभिषेकाने संपन्न झाली.
शहरात शिस्तबद्धपणे आणि शांततेत पार पडलेल्या या कावड शोभायात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.