अकोट – अकोट ते सावरा दरम्यान रस्त्याचे काम अर्धवट सोडल्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
रस्त्यावर खोदलेले खड्डे, अंधारात न दिसणारे उतार यामुळे अनेक वाहनचालक अपघातग्रस्त होत आहेत.
यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रस्ता ठप्प, वाहतूक अडचणीत
अकोटपासून ढगा फाटा ते सावरा या मार्गावर मागील काही दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू असून ते सध्या रखडले आहे.
त्यामुळे मोठमोठे खड्डे आणि उखडलेला रस्ता नागरिकांच्या जीवावर बेततोय. रात्रंदिवस वाहतुकीचा ओघ सुरू असतानाही
प्रशासन आणि कंत्राटदारांनी कोणतीही खबरदारी घेतलेली नाही, हे विशेष.
गौरखेड गावातील शुभम खंडारे गंभीर जखमी
१९ जुलै रोजी रात्री गौरखेड येथील शुभम खंडारे अकोटहून परत जात असताना ढगा फाट्याजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झाला.
या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली असून प्रथम मंचनपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत.
स्थानिकांचा संताप; रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी
सावरा आपत्कालीन ग्रुपकडून या अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली.
मात्र या प्रकारांमुळे अकोट ते सावरा रस्त्यावरील नागरिक त्रस्त झाले असून शासनाच्या संबंधित विभागाने
तात्काळ हस्तक्षेप करून रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
नागरिकांचे म्हणणे:
“प्रशासनाने जर वेळेवर लक्ष दिले नाही, तर याच खड्ड्यांमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.” – स्थानिक नागरिक
मागणी:
अकोट–सावरा रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा, अन्यथा जनआंदोलन हत्यार बनवले जाईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-rural-polysanchi-jalad-action-vinayabhangi-cases-of-opponed-24-tasant-dosha/