अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल

अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल

अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.

 

प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला आपल्या मुलांसह घरात झोपलेली असताना दिनांक १८ जुलै रोजी रात्री सुमारास यशवंत विनायक वानखडे (वय ३५, रा. बोचरा, ता. अकोट, जि. अकोला) हा तिच्या घरात घुसला आणि वाईट उद्देशाने तिचा हात पकडत विनयभंग केला. पीडित महिलेने आरडाओरडा केल्यावर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

Related News

 

या घटनेवरून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भादंवि २०२३ मधील कलम ७४ अन्वये गुन्हा (गु. र. नं. ३४४/२०२५) दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपास पथक तयार करून फिर्यादीचे १८३ बीएनएसएस अंतर्गत जबाब न्यायालयात नोंदविले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात आले.

 

या प्रकरणात केवळ २४ तासांत दोषारोपपत्र तयार करून दिनांक १९ जुलै २०२५ रोजी न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

 

सदर जलद आणि ठोस कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, पोहेकॉ. वासुदेव ठोसरे, शिवकुमार तोमर, पोकॉ. सागर नागे, गोपाल जाधव आणि महिला पोलीस कॉ. स्वाती भेंडेकर यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.

या प्रकरणातील पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.

Related News