अकोट महामार्गावर प्रवासी निवाऱ्यांचा अभाव, रयत शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

अकोट महामार्गावर प्रवासी निवाऱ्यांचा अभाव,रयत शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

अकोट,प्रतिनिधी

अकोट अकोला राज्य महामार्गावर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा म्हणून असलेले निवारे मागील दशकभरातच हटविण्यात आले.

मात्र, आजतागायत या निवाऱ्यांची पुनर्बांधणी झालेली नाही. पावसाळ्याच्या दिवसांत विद्यार्थ्यांपासून ते दिव्यांगांपर्यंत अनेक

प्रवासी उघड्यावर थांबण्यास भाग पाडले जात आहेत. महामार्गावर कानडी, उगवा, करोडी,

वणीवारुळा यांसारख्या फाट्यांवर थांबण्यासाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था नाही.

त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रयत शेतकरी संघटनेने एक महिन्यात निवारे बांधण्यात यावेत,

अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अकोट राज्य महामार्गावरील प्रवाशांची गैरसोय दिवसेंदिवस वाढत असून गावागावांमध्ये प्रवासी निवाऱ्यांचा अभाव ही गंभीर समस्या बनली आहे.

याच पार्श्वभूमीवर रयत शेतकरी संघटनेतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या

अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

सन २००० मध्ये या महामार्गावरील गावांच्या हद्दीत प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले होते.

मात्र काही वर्षांपूर्वी महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान हे निवारे हटविण्यात आले.

त्यानंतर गेले दहा वर्षे या ठिकाणी कोणतेही नविन निवारे उभारण्यात आलेले नाहीत.

परिणामी,पावसाळ्यात शेतकरी,विद्यार्थी,दिव्यांग आणि अधिकारी वर्गाला उघड्यावर थांबण्याची वेळ येत आहे.

महामार्गावरील कानडी फाटा,उगवाफाटा,वल्लभनगर,गांधीग्राम,करोडी फाटा,दहिहांडा फाटा,कुटासा फाटा,देवरी फाटा,बळेगाव फाटा,

वणीवारुळा फाटा,आदी ठिकाणी प्रवाशांना थांबण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.याउलट रस्त्यालगतची

झाडे-झुडपेही तोडण्यात आल्याने सावलीसुद्धा उरलेली नाही.

रयत शेतकरी संघटनेने या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देत लवकरात लवकर

निवारे बांधावेत किंवा पर्यायी व्यवस्था करावी.अशी जोरदार मागणी केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की,एक महिन्यात कोणतीही कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

आणि त्यास सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग राहील.हे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता,

जिल्हाधिकारी अकोला,आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.

आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन पुढील पावले कधी उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/tannedar-pohekar-yancha-hospitality/