अकोल्यातील मोरणा घाट गणेश विसर्जनासाठी सज्ज

मोरणा घाट विसर्जनासाठी घाट गजबजणार

 अकोला –  मोरणा घाटावर यंदा गणेश विसर्जनाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सकाळपासूनच भाविक भक्त आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी घाटावर मोठ्या संख्येने दाखल होणार असून, यासाठी प्रशासन आणि महानगरपालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.

यावर्षी मोरणा घाटावरील एकूण ७ विसर्जन कुंडांवर गणेश विसर्जन होणार आहे. प्रत्येक कुंडाजवळ सुरक्षेची आणि स्वच्छतेची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी घाट परिसरात पुरेशी प्रकाशयोजना करण्यात आली असून, मार्गदर्शनासाठी स्वयंसेवकांची नेमणूकही करण्यात आली आहे.

गणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी अकोला महानगरपालिकेचे तब्बल १०० कर्मचारी घाटावर नियुक्त आहेत. हे कर्मचारी विसर्जन स्थळावरील स्वच्छता, वाहतूक नियंत्रण आणि इतर सोयीसुविधा पाहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मोरणा घाट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिस विभाग, होमगार्ड तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात केले गेले आहे.

प्रशासनाने सर्व भाविकांना आवाहन केले आहे की, त्यांनी शांततेत आणि सुरक्षित वातावरणात गणरायाला निरोप द्यावा. शहरातील विविध मंडळे आणि घरगुती गणेश मूर्ती घेऊन भक्त सकाळपासून घाटावर दाखल होतील. ढोल-ताशांच्या गजरात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे.

मोरणा घाट परिसर गणेश भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून जाण्याची उत्सुकता सर्वत्र आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/immersion-of-cleanliness-and-lightchi-arrangement/