विठ्ठल महल्ले :अकोला
अर्धवट जळालेल्या मृतदेहाने उडाली शहरात भीती
20 वर्षांपूर्वीच्या शरद टोंगळे हत्याकांडाच्या आठवणी ताज्या
अकोला : शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पुन्हा एकदा थरारक हत्याकांड उघडकीस आले आहे. अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात 30 ते 35 वयोगटातील विवाहितेची हत्या करून तिचा मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीती व खळबळ उडाली आहे. डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अन्नपूर्णा माता मंदिराच्या पाठीमागील मैदानात हा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रकार रविवारी रात्री घडला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, दीप अकोटकर व प्रेम पांडे हे दोन युवक सायंकाळी रनिंगसाठी या परिसरात गेले असता त्यांना संशयास्पद अवस्थेत एक व्यक्ती पडलेली दिसली. सुरुवातीला दारू पिऊन कोणी पडले असावे असा त्यांचा समज झाला; मात्र जवळ जाऊन पाहिल्यावर अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच डाबकी रोडचे प्रभारी ठाणेदार अभिषेक अंधारे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकरराव शेळके तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Related News
…….शहरात वाढती दहशत
गेल्या काही दिवसांत खून, हाणामाऱ्या आणि सशस्त्र हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा समोर आलेल्या या हत्याकांडामुळे अकोला शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
…..20 वर्षांपूर्वीच्या हत्याकांडाची आठवण पुन्हा ताजी
या परिसरात यापूर्वीही सुमारे 20 वर्षांपूर्वी घडलेल्या शरद टोंगळे हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले होते. जुने शहरातील गुरुदेव नगर येथील 25 वर्षीय शरद टोंगळे यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर छायाचित्रकार विशाल महाजन यांचीही हत्या करून त्यांचा मृतदेह याच परिसरात फेकण्यात आल्याची घटना घडली होती. सध्याच्या घटनेतही मृतदेह त्याच परिसरात आढळून आल्याने जुन्या हत्याकांडाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
“विवाहितेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे. संबंधित महिला कोण आहे, याचा शोध सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. प्रथमदर्शनी महिलेचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे.”
— अभिषेक अंधारे, प्रभारी ठाणेदार, डाबकी रोड पोलीस ठाणे
read also : https://ajinkyabharat.com/csks-victory-hat-trick/
