अकोल्यात माणुसकीचं दर्शन; महिला वाहतूक पोलिसांनी वाचवला जखमी कबुतराचा जीव

जखमी कबुतराचा जीव

अकोल्यातून एक संवेदनशील आणि माणुसकी जपणारी घटना समोर आली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारी ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट ऑफिस चौकात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला एक कबुतर वाहतुकीच्या गर्दीत मृत्यूच्या छायेत सापडला होता. मात्र, कर्तव्यावर असलेल्या महिला वाहतूक पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि करुणा या मुक्या जीवासाठी संजीवनी ठरली.

पोस्ट ऑफिस चौकात भरधाव वाहनांची वर्दळ सुरू असतानाच अचानक रस्त्यावर पडलेला कबुतर उडू शकत नव्हता. कोणत्याही क्षणी वाहनाखाली चिरडला जाण्याची भीती निर्माण झाली होती. याच वेळी चौकात कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक महिला पोलिस अश्विनी चौधरी यांच्या लक्षात ही बाब आली.

क्षणाचाही विलंब न करता  त्या जखमी कबुतराला रस्त्यावरून उचलले आणि सुरक्षित ठिकाणी नेले. त्यानंतर कबुतरावर उपचार व्हावेत, यासाठी त्यांनी त्याला पशुसंवर्धन दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविवार असल्याने दवाखाना बंद असल्याचे समोर आले.

Related News

तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. उपचारासाठी कबुतराला मेडिकलमध्ये नेण्यात आले, मात्र तेथेही आवश्यक वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. अखेर, माणुसकीचा खरा अर्थ अधोरेखित करत महिला पोलिस अश्विनी चौधरी यांनी त्या जखमी कबुतराला आपल्या निवासस्थानी नेऊन त्याला आश्रय दिला.

कर्तव्याच्या पलीकडे जाऊन दाखवलेली ही करुणा आणि संवेदनशीलता आज समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, ‘पोलीस म्हणजे केवळ कायदा नव्हे तर माणुसकीही’ हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/huge-treasure-of-thousands-of-years-found-in-the-sea-a-big-shock-for-archaeologists/

Related News