अकोल्यात शेतकरीपुत्राची आत्महत्या

कर्ज, नैराश्य आणि पिकांचे नुकसान; अभिलाषने संपवले आयुष्य

रेपाडखेड गावात शोककळा; शासनाविरोधात रोष

अकोला, दि. 31 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हाल काही संपत नाहीत.

मुर्तीजापूर तालुक्यातील रेपाडखेड गावात पुन्हा एकदा शेतकरीपुत्राने

आत्महत्या करून दुर्दैवी घटना घडवून आणली.

27 वर्षीय अभिलाष गजानन मिलखे याने चार दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते.

त्याच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.

मात्र 30 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अभिलाषच्या

तीन एकर शेतातील हिरवेगार पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

आधीच कर्जाचा ताण, बँका व सावकारांचा तगादा आणि आता पिकाचे

नुकसान या संकटांमुळे तो मानसिक नैराश्यात गेला.

शेवटी त्याने आयुष्य संपवण्याचा मार्ग निवडला.

आज सकाळी शोकाकुल वातावरणात त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला.

अंत्यसंस्कारावेळी परिसरातील शेकडो शेतकरी,

नातेवाईक व शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त झाला.

“कर्जमाफी फक्त कागदावर, प्रत्यक्षात मदत शून्य,” असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

गेल्या काही महिन्यांपासून बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सिंचनाच्या सोयी नसणे, पीक विम्याची रक्कम न मिळणे,

तर दुसरीकडे बँक व सावकारांचा तगादा या सगळ्यामुळे शेतकरी वर्ग नैराश्यात ढकलला जात आहे.

शेतकरी संघटनांनी शासनाकडे ठोस मागणी केली आहे की,

अभिलाषच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी,

पीक विम्याची थकबाकी रक्कम अदा करावी आणि संपूर्ण कर्जमाफी करावी.

“फक्त आश्वासने नकोत; ठोस मदत हवी,” असा इशाराही संघटनांनी दिला आहे

Read also : https://ajinkyabharat.com/kalam-370-hatvu-shakta-mag-maratha-reservation-saathi-adatha/