अकोला : अकोला जिल्ह्यातील 64 गावांना पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जेसीबीच्या धडकामुळे
फुटल्याची घटना अकोला-मूर्तिजापूर मार्गावरील दहिगाव गावंडे परिसरात घडली.
या घटनेत लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला असून शेजारच्या शेतात पाणी शिरल्याने सुमारे दोन एकर शेतीचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला ते मूर्तिजापूर दरम्यान एका पुलाच्या कामासाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू
असताना ही दुर्घटना घडली. खोदकामादरम्यान जमीन खाली असलेल्या मुख्य जलवाहिनीला फटका बसला आणि ती फुटली.
त्यामुळे पाण्याचे जबरदस्त दाबाने तीस ते चाळीस फूट उंच उडणारे फवारे निर्माण झाले होते.
या अपघातामुळे परिसरात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय झाला असून 64 गावांचा
पाणीपुरवठा काही वेळासाठी विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले असून याबाबत शेतकऱ्यांनी तत्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
दुर्घटनेनंतर जलसंपदा विभागाने घटनास्थळी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
मात्र या घटनेमुळे जलवाहिनीच्या देखभाल व्यवस्थेवर आणि रस्ते विकास प्रकल्पातील समन्वय अभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी याप्रकरणी जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sahityaratna-annabhau-sathe-yanchi-jayanti-sari/
