महापालिकेच्या जलकुंडात विसर्जनाची सोय, मोर्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सात कुंडांची निर्मिती
अकोला – सार्वजनिक गणेश मंडळांसोबतच घरगुती गणेश विसर्जनालाही सुरुवात झाली आहे. अकोला महापालिकेने मोर्णा नदीच्या काठावर तयार केलेल्या गणेश घाटावर भाविकांनी सकाळपासूनच आपल्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यास सुरुवात केली.अकोल्यात विसर्जनाची खासियत म्हणजे महापालिकेने बांधलेल्या कायमस्वरूपी जलकुंडातच विसर्जनाची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे. नदीचे पाणी दूषित होऊ नये, पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी महापालिकेने सात कुंडांची निर्मिती केली असून विसर्जनानंतर जमा झालेल्या मूर्ती कुंभारी येथील तलावात (सुमारे 10 कि.मी अंतरावर) विसर्जित केल्या जात आहेत.सकाळी दहा वाजल्यापासून घरगुती भाविकांनी आपल्या आराध्य दैवताला डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर “गणपती बाप्पा मोरया” चा जयघोष करत निरोप दिला. या पारंपरिक विधींसोबतच शहरात शिस्तबद्ध आणि शांततेत विसर्जन पार पडावे यासाठी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/parsodamarutiraaychi-187-varshchi-yatra-concluded/