गच्चीवर नंदनवन ! अकोल्यातील संदीप तिहीले यांचा अनोखा प्रयोग; लाखोंची कमाई
अकोला :शहरांमध्ये जागेअभावी शेती करणे अशक्य मानले जाते. मात्र रणपिसे नगर, अकोला येथील संदीप तिहीले यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच नंदनवन उभारून दाखवले आहे. त्यांनी शंभराहून अधिक दुर्मीळ झाडे लावून गच्चीवरच एक समृद्ध बाग फुलवली आहे.या बागेत ड्रॅगन फ्रुट्स, जाम, नींबू, लिंब, तुळस, अशोक, कढीपत्ता, लवंग, विलायची, सुपारी, दालचिनी, जायफळ, बदाम, पिस्ता, खजूर, अंजीर, कॉफी, कोको आणि हिरवा चहा यांसारखी देश-विदेशातील झाडे वाढवली आहेत. त्यासोबत आवळा, शतावरी, घृतकुमारी, हळद, अद्रक, पुदीना, ब्राम्ही, गुळवेल, अर्जुन यांसारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींनी ही बाग अधिक समृद्ध केली आहे.या झाडांपासून मिळणारी फळे, फुले, मसाले आणि औषधी पानांची विक्री करून तिहीले दरवर्षी लाखो रुपयांची कमाई करत आहेत. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे गच्चीवर शेती करणे फायद्याचे आणि प्रेरणादायी ठरू शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.परिसरातील नागरिक त्यांच्या गच्चीवरील बागकाम पाहून आश्चर्यचकित झाले असून, अनेकांनी या पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. “जागा कमी असली तरी इच्छाशक्ती असेल, तर गच्चीवरच सोन्याची शेती करणे शक्य आहे,” असे संदीप तिहीले सांगतात.
संदीप तिहीले यांच्या गच्चीवरील नंदनवनामुळे आधुनिक शेतीला नव्या शक्यता लाभत असून, हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
read also :https://ajinkyabharat.com/entrepreneurship-awareness-program-concluded/
