आईच्या टाहोने गोंडेगाव सुन्न, गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

हृदयद्रावक! ४ वर्षीय स्वराजचा नाल्यात पडून मृत्यू

वाशिम : वाशिम जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्या, नाले आणि ओढे ओसंडून वाहत आहेत. याच पावसाच्या पाण्याने शनिवारी गोंडेगाव (ता. मंगरुळपीर) येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. चार वर्षांचा स्वराज अशोक खिल्लारे हा निरागस जीव पावसाच्या पाण्याने भरलेल्या सिमेंट नाल्यात पडून वाहून गेला. तासाभरानंतर जेसीबीच्या साहाय्याने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आपल्या बाळाचा मृतदेह पाहताच आईने फोडलेल्या टाहोने गोंडेगाव सुन्न झाले.

घटना अशी घडली

मूळचा हिंगोली जिल्ह्यातील जामठी गावचा रहिवासी असलेला स्वराज आपल्या आईसोबत माहेरी गोंडेगावला आला होता. शनिवारी सकाळी तो घराबाहेर इतर चिमुकल्यांसोबत खेळत होता. दरम्यान पावसाच्या पाण्याने भरलेल्या सिमेंट नाल्यात त्याचा पाय घसरला. नाल्यातील पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने तो वाहून गेला.क्षणभरात मुलगा दिसेनासा झाल्याचे लक्षात येताच आईसह घरच्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. मात्र नाल्यातील पाणी मोठ्या वेगाने जात असल्याने स्वराज कुठे गेला याचा काहीच मागमूस लागत नव्हता. गावकरी, नातेवाईक यांनी जीवाचा आटापिटा करून जवळपास तासाभर शोध घेतला.

शेवटी जेसीबीने शोध लागला

नाल्याच्या तोंडावर सिमेंट पाईप असल्याने स्वराज त्यात अडकला होता. गावकऱ्यांनी प्रशासनाच्या मदतीने जेसीबी बोलावून नाली फोडली. तेव्हा आत अडकलेला स्वराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा क्षण अंगावर काटा आणणारा होता.

आक्रोशाने गाव सुन्न

निरागस बाळाचा मृतदेह पाहताच आईचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश सर्वांना अश्रू अनावर करून गेला. गावातील प्रत्येकाचा जीव थरारून गेला. एका क्षणात खेळता-बोलता मुलगा गमावल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गोंडेगावात शोककळा पसरली असून गावकरी आजही या घटनेतून सावरू शकलेले नाहीत.

read also : https://ajinkyabharat.com/14-year-old-mulichya-dhadasi-takrinantar-dhakkadayak-episode/