राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी तीव्र उष्णता तर कधी अचानक पावसाच्या सरी, अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांसह शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग (IMD) ने पुन्हा एकदा राज्यासाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस कोसळत असून काही ठिकाणी गारपिटीचाही मोठा फटका बसला आहे. मार्च महिन्यात अशा प्रकारचा पाऊस होत असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. IMD च्या ताज्या अंदाजानुसार आजही राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर वातावरण ढगाळ होऊन पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. याचबरोबर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Related News
या अवकाळी पावसामुळे शेती क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. 16 मार्च ते 20 मार्च या कालावधीत राज्यातील तब्बल 24 जिल्ह्यांना पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा फटका बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 51,488 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या रब्बी पिकांसह फळबागांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
विदर्भातील अनेक भागांमध्ये गारपिटीमुळे पिकांची मोठी हानी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेलूद परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी कौतिकराव इंगळे यांनी आपल्या दोन एकर शेतात केळीची लागवड केली होती. मात्र अचानक आलेल्या गारपिटीमुळे केळीच्या झाडांची पाने फाटली असून फळांवर काळे डाग पडले आहेत. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
तज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या हवामान बदलामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच शासनाकडून पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच विजेच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
