अखेर ज्याची भीती होती तेच घडलं ! राजेश मापारी यांनी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला.

राजेश मापारी

लोणार तालुक्यात काँग्रेसमध्ये मोठे भगदाड पडण्याची चिन्हे आता स्पष्ट दिसू लागली आहेत. गेल्या 32 वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावान व कट्टर कार्यकर्ते असलेले राजेश मापारी यांनी अखेर आज काँग्रेस जिल्हा सरचिटणीस व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला.

पक्षातील अन्याय, पैशाने उमेदवारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचा अवमान… हा होता मुख्य मुद्दा !

राजेश मापारी यांनी 1995 ला युवक काँग्रेस शहराध्यक्ष, 1998 ला तालुका काँग्रेस सरचिटणीस, सलग 18 वर्षे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशी उल्लेखनीय वाटचाल केली. त्यांच्या नेतृत्वामुळे तालुक्यात काँग्रेसची संघटना मजबूत राहिली.त्यांचे चिरंजीव गेली 7 वर्षे युवक काँग्रेस बुलढाणा जिल्हाध्यक्ष पद सांभाळत आहेत.

परंतु नगरपालिका निवडणुकीत पैशाने उमेदवारी देत जुन्या कार्यकर्त्यांना डावलून, नुकतेच पक्षात दाखल झालेल्या आणि कालपर्यंत काँग्रेसविरोधात बोलणाऱ्या लोकांना तिकीट देण्यात आले, असा गंभीर आरोप मापारी यांनी केला.मेहकर मतदारसंघातील काही मोठ्या नेत्यांनी “पैसे घेऊन” उमेदवारी दिल्याचा त्यांनी थेट आरोप करत, निष्ठावान कार्यकर्त्यांचा अवमान सहन न झाल्याने राजीनामा दिल्याचे नमूद केले.

काँग्रेसमध्ये मोठा अंतर्गत असंतोष ?

मापारी यांच्या जाण्यामुळे तालुक्यातील काँग्रेसमध्ये मोठी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षे पक्षासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात असून, येत्या काळात पक्षात शांतता भंग होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

 राजेश मापारी यांच्या राजीनाम्यामुळे लोणार तालुक्यात काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/ipl-2026-rajasthan-royals-mahatvacha-after-jadeja-legendary-paratala-concussion/