काळाच्या ओघात आयुष्य वेगवेगळ्या वाटांवर गेले तरी महाविद्यालयीन मैत्रीचे बंध कधीच तुटत नाहीत, याचा प्रत्यय ‘स्नेहबंध १९९५’ या स्नेहमेळाव्यातून पुन्हा एकदा आला. तब्बल ३० वर्षांनंतर १९९५ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र येत आपले जुने स्नेहबंध नव्याने दृढ करताना दिसले. तिडके नगर येथील भागधारक भवन येथे हा भावूक आणि उत्साहपूर्ण गेट-टुगेदर सोहळा मोठ्या आनंदाच्या वातावरणात पार पडला.
या सोहळ्याला १९९५ च्या बॅचमधील तब्बल ४४ माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. अनेक जण वर्षानुवर्षे संपर्कात नव्हते, मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीगाठी झाल्या. बालपण, तारुण्य आणि शिक्षणाच्या काळातील आठवणींनी या सोहळ्याला विशेष भावनिक रंग चढवला.
गुरु-शिष्यांचा अपूर्व संगम
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. गोडे सर यांनी भूषविले. तर प्रा. पांडे, प्रा. दिनानाथ गायकवाड, प्रा. डॉ. गोपाल उपाध्ये, प्रा. डॉ. के. डी. गावंडे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्राध्यापकांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला वेगळीच उंची प्राप्त झाली.
Related News
यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापकांनी बदलत्या काळात यश, पद आणि प्रतिष्ठेबरोबरच माणुसकी, मूल्ये आणि मैत्री जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ३० वर्षांनंतर आपल्या विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक, व्यावसायिक आणि समाजाशी बांधिलकी ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पाहताना शिक्षकांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्टपणे दिसून येत होता.
मनोगतांनी जाग्या झाल्या आठवणी
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शारदा खोकले, कविता पोपळे, अर्चना उंबरकर, कुमुदिनी जोगी, सतीश मोखडकर, कुंदन देशमुख, प्रा. मुकेश सरदार, गजानन हरणे यांनी आपले अनुभव, संघर्ष आणि यशकथा उपस्थितांसमोर मांडल्या. प्रत्येकाच्या शब्दांतून मैत्री, कृतज्ञता आणि महाविद्यालयीन जीवनाबद्दलचे प्रेम स्पष्टपणे जाणवत होते.
आठवणींचा जिवंत सोहळा
भागधारक भवन येथे आयोजित या कार्यक्रमात जुन्या गप्पा, वर्गातील खोड्या, परीक्षा, प्राध्यापकांची शिस्त, तसेच आयुष्यातील चढ-उतार यावर मनमोकळी चर्चा झाली. एकमेकांच्या कौटुंबिक व व्यावसायिक प्रगतीची माहिती घेत सर्वांनी एकमेकांचे कौतुक केले. हा सोहळा केवळ गेट-टुगेदर न राहता नात्यांचा आणि आठवणींचा जिवंत उत्सव ठरला.
नियोजनबद्ध कार्यक्रमाची प्रभावी सांगता
कार्यक्रमाचे सुंदर, नेटके आणि ओघवते सूत्रसंचालन प्रा. एल. डी. सरोदे यांनी केले. त्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साह टिकून राहिला. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. अर्चना गबर झोपाटेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या सोहळ्यासाठी सुनील पवार, माधव कुडतरकर, संजय खंडारे, बंडू पाटील घाटे, नितीन शिंदे यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा यांच्या विचारांच्या स्मरणाने आणि गाडगे महाराजांच्या प्रार्थनेने करण्यात आली. ‘जगाच्या कल्याणासाठी’ झटणाऱ्या संतांच्या प्रार्थनेमुळे वातावरणात एक प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
read also : https://ajinkyabharat.com/stubbornness-giving-shape-to-dreams-lakshmi-chakranarayan-psi-padavar-virajman/
