समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; टायर फोडून प्रवाशांची लूट, 18 लाखांचा ऐवज लंपास!

समृद्धी

समृद्धी महामार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ; टायर फोडून लुटमार, दगडफेक अन् हवेत गोळीबार, तब्बल १८ लाखांचा ऐवज लंपास

 नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांच्या टोळीने वाहनांना लक्ष्य करत टायर पंक्चर करून प्रवाशांची लूट केल्याच्या थरारक घटना समोर आल्या आहेत. रस्त्यावर खिळे आणि धारदार लोखंडी वस्तू टाकून वाहनांचे टायर फोडणे, वाहन थांबताच दगडफेक व मारहाण करणे आणि प्रवाशांकडील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने हिसकावून घेणे, अशा प्रकारांमुळे महामार्गावरील रात्रीचा प्रवास धोकादायक बनला आहे.

सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारातील समृद्धी महामार्गावर चॅनेल क्रमांक 538 ते 543 दरम्यान दरोडेखोरांनी एकाचवेळी अनेक वाहनांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमध्ये काही प्रवाशांकडून सोन्या-चांदीचे दागिने, महागडी घड्याळे आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. एका घटनेत तर लुटारूंनी प्रवाशांना घेरून तब्बल १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

टायर पंक्चर करून वाहनांना अडवले

मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी समृद्धी महामार्गावर रस्त्यावर खिळे आणि धारदार लोखंडी वस्तू टाकल्या होत्या. या वस्तूंवरून वाहने गेल्यानंतर त्यांच्या टायरमध्ये पंक्चर झाले आणि चालकांना नाईलाजाने वाहन थांबवावे लागले. वाहन थांबताच अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी प्रवाशांना घेरले.

Related News

या प्रकारात श्रीकांत मिश्रा, पांडुरंग माने आणि मोहम्मद फरान यांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले. वाहन थांबल्यानंतर सुमारे दहा अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करत प्रवाशांना धमकावले. काही प्रवाशांकडील मौल्यवान वस्तू बळजबरीने काढून घेण्यात आल्या. अरिहन लानी यांनी मात्र वाहन न थांबवता तेथून वेगाने पुढे जात स्वतःचा बचाव केल्याचे समोर आले आहे.

परवानाधारक पिस्टलने हवेत गोळीबार

मोहम्मद फरान यांच्या वाहनाचे टायर पंक्चर झाल्यानंतर दरोडेखोर वाहनाजवळ येत असल्याचे लक्षात आले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून फरान यांनी त्यांच्या परवानाधारक पिस्टलमधून हवेत दोन राऊंड गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज होताच दरोडेखोरांमध्ये घबराट निर्माण झाली.

त्याचवेळी महामार्ग पोलीस आणि वावी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याने दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सिन्नर महामार्ग पोलीस, वावी पोलीस ठाणे आणि QRV पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बाधित प्रवाशांना तातडीने मदत केली.

वकिलाच्या वाहनावरही दरोडेखोरांचा हल्ला

दरम्यान, सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक 542.1 येथे आणखी एक गंभीर दरोड्याची घटना घडली. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या चाकांसमोर अज्ञात दरोडेखोरांनी लोखंडी वस्तू फेकून वाहने थांबवली.

वाहने थांबताच सुमारे 30 ते 35 वर्षे वयोगटातील 11 ते 12 हिंदी भाषिक दरोडेखोरांनी प्रवाशांना घेरले. दरोडेखोरांनी लाकडी दांडक्यांनी प्रवाशांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने, महागडी घड्याळे आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली.

या घटनेत छत्रपती संभाजीनगर येथील वकील श्रीकांत राजेंद्रप्रसाद मिश्रा (वय 37) यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरोड्यात एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याचे तक्रारीत नमूद आहे.

टोलनाक्याजवळ तरुणाची सोन्याची चेन हिसकावली

समृद्धी महामार्गावर लुटमारीची आणखी एक घटना समोर आली आहे. साहिल सतीश सोनवणे (वय 22) हे 26 ऑगस्ट रोजी नागपूरहून मुंबईच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते. मुंबई कॉरिडॉरमधील एक्सिट क्रमांक 18 जवळील टोलनाक्याच्या परिसरात त्यांचे वाहन अडवण्यात आले.

एका सेल्टोस कारने सोनवणे यांची गाडी अडवली, तर एक्सयूव्ही 700 मधून काही व्यक्ती खाली उतरल्या. चार जणांनी सोनवणे यांच्या वाहनाजवळ येत त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर एका आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली. झटापटीदरम्यान चेन तुटली आणि आरोपी चेन घेऊन पसार झाले.

या सोन्याच्या चेनची किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असून तिचे वजन दोन तोळे पाच ग्रॅम असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 310(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२४ तास गस्त वाढवली

समृद्धी महामार्गावर सलग घडलेल्या या घटनांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी निर्जन भागात वाहन पंक्चर झाल्यास प्रवाशांसमोर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

घटनांची गंभीरता लक्षात घेऊन महामार्गावर पोलिसांची २४ तास गस्त वाढवण्यात आली असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे, वाहनांची माहिती आणि उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला जात आहे.

समृद्धी महामार्ग हा राज्यातील महत्त्वाचा द्रुतगती मार्ग असून दररोज मोठ्या संख्येने वाहने या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी नियमित गस्त, संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, प्रवाशांनी रात्रीच्या वेळी वाहन पंक्चर झाल्यास किंवा रस्त्यावर संशयास्पद वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, तसेच शक्य असल्यास सुरक्षित ठिकाणी वाहन थांबवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या घटनांमागील टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

 

Read Also : https://ajinkyabharat.com/rahul-gandhi/

Related News