मराठी चित्रपटसृष्टीतील देखणे अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या व्यक्तिमत्त्वाची क्रेझ किती होती, याबाबत अभिनेत्री गार्गी फुले यांनी एक खास आठवण सांगितली आहे. त्यांच्या जॉगिंगपासून घरगुती गप्पांपर्यंतचे अनेक किस्से जाणून घ्या.
रवींद्र महाजनींच्या देखणेपणाची जबरदस्त क्रेझ! जॉगिंग करताच तरुणी मागे धावत; गार्गी फुले यांनी सांगितला खास किस्सा
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील देखणे आणि लोकप्रिय अभिनेते म्हणून रवींद्र महाजनी यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. त्यांच्या अभिनयाइतकाच त्यांचा रुबाब, व्यक्तिमत्त्व आणि स्टाईल यांचीही प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा असायची. अभिनेत्री गार्गी फुले यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवींद्र महाजनी यांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित एक खास आठवण सांगितली असून, ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत गार्गी फुले यांनी सांगितले की, रवींद्र महाजनी यांचा दररोजचा जॉगिंगचा दिनक्रम परिसरातील अनेकांसाठी आकर्षणाचा विषय होता. त्या म्हणाल्या, “रवी काका व्हाईट शॉर्ट्स आणि व्हाईट टी-शर्ट घालून जॉगिंगसाठी बाहेर पडायचे. ते मैदानावर आले की त्यांच्या मागून पाच-सहा मुली तरी रोज धावत असायच्या. कोणी त्यांना थांबवून ते कुठे राहतात, त्यांचा पुढचा चित्रपट कधी येणार, असे प्रश्न विचारायचे. त्यांच्या देखणेपणामुळे, अभिनयामुळे आणि लोकप्रियतेमुळे आमच्या कॉलनीत त्यांची वेगळीच क्रेझ होती.”
Related News
गार्गी फुले यांनी पुढे सांगितले की, रवींद्र महाजनी मैदानावर आले की अनेक जण त्यांना पुन्हा-पुन्हा वळून पाहत असत. त्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जादू एवढी होती की, सामान्य चाहत्यांपासून तरुणींमध्येही त्यांची प्रचंड लोकप्रियता होती. हा सगळा अनुभव लहानपणी पाहताना स्वतःलाही मोठी गंमत वाटायची, असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी आणखी एक कौटुंबिक आठवण सांगताना म्हटले की, “बाबा घरी असले की रवी काका कधी चहा प्यायला तर कधी सहज गप्पा मारण्यासाठी आमच्या घरी यायचे.” त्यामुळे त्यांच्याशी कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यक्तिमत्त्व आणि अभिनयाची अनोखी छाप
रवींद्र महाजनी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. देखणा चेहरा, दमदार अभिनय आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स यामुळे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांच्या अभिनयाची आणि स्टाईलची चर्चा आजही चाहत्यांमध्ये कायम आहे.
‘झुंज’पासून यशस्वी प्रवास
रवींद्र महाजनी यांनी ‘झुंज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘देवता’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘कशाला उद्याची बात’, ‘हळदी कुंकू’, ‘कळत नकळत’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयामुळे आणि देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
गार्गी फुले यांनी सांगितलेल्या या आठवणींमुळे रवींद्र महाजनी यांच्या लोकप्रियतेचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी हा किस्सा जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरत आहे.
