मुर्तीजापुर येथील योगी आदित्यनाथ यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या, नागरिकांनी फिरवली पाठ

 

मुर्तीजापुर : भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बुलडोझर बाबा योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे बुधवारी मुर्तीजापुर येथे आयोजन केले होते. मात्र या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याने मंडपात रिकाम्या खुर्च्या दिसून आल्या.

योगी आदित्यनाथ यांच्या सभेला वाशिम व अकोला जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा होती. मात्र प्रत्यक्षात तो कल्पनाविलास ठरला. दर्यापूर कारंजा अकोला व वाशिम जिल्ह्यातून पाहिजे त्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक सभेला आले नाही. सध्या मुर्तीजापुर मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे काही पदाधिकारी, कार्यकर्ते सभेला आले मात्र मंडपात गेले नाही. रस्त्यावर दूर उभे राहूनच त्यांनी भाषण ऐकले.

आयोजकांतर्फे दुपारी 2 वाजून 30 मिनिटांची सभेची वेळ देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात चार वाजता योगी आदित्यनाथ यांचे हेलिकॉप्टर उतरले, अन चार वाजून वीस मिनिटांनी योगींचे भाषण सुरू झाले. नागरिक दोन वाजेपासून योगी आदित्यनाथ यांचे भाषण ऐकण्यासाठी ताटकळत होते, मात्र दोन तास त्यांना वाट पहावी लागली.