लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये नागरिकांना दिवाळीची मोठी भेट देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना चोवीस तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या नव्या घोषणेमुळे नागिरकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी संध्याकाळी जिल्हा दंडाधिकारी, विभागीय आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी बैठक घेत अधिकाऱ्यांना दिवाळी सणाबाबत काही निर्देश दिले आहे. हिंदू सण उत्साहामध्ये साजरे करता यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. 28 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत राज्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये. सणांच्या आनंदाच्या आणि उत्सवाच्या या काळात 28 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात 24 तास अखंड वीज पुरवठा व्हावा. यासाठी वीज महामंडळाने आवश्यक ती तयारी करावी.” अशा सूचना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत.