इस्रायलचा गाझामध्ये कहर; हमास लष्कराच्या निशाण्यावर

गाझा: सध्या इस्त्रायल-हमास यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहेत. दरम्यान इस्त्रायलने हमासला पूर्ण नष्ट केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही असे स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल हमासवर सतत जोरदार आणि घातक असे हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमध्ये हमासच्या सर्वोच्च कमांडरचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इस्त्रायली लष्कराने उत्तरेकडील गाझा पट्टीवर पुन्हा एकदा जोरदार हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 87 लोक ठार झाल्याचे झाल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

याशिवाय, बीट लाहिया शहरातील या हल्ल्यांमध्ये 40 लोक गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझाच्या उत्तरेकडील काठावर वसलेले बीट लाहिया हे शहर, हमासच्या लढाऊ गटासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. इस्रायलने गेल्या दोन आठवड्यांपासून या प्रदेशात मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू केली आहे. इस्त्रायलच्या म्हणण्यानुसार, हमासने या शहरात पुन्हा आपली सैन्य रचना केली आहे. या हिंसक कारवायांमुळे स्थानिक लोकांना जीव गमवावा लागत आहे आणि आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे.

लेबनीज लष्कराने केली हल्ल्यांची पुष्टी

तर इस्रायली सैन्याच्या या कारवाईवर अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, इस्रायलने गाझामध्ये हवाई हल्ल्यांसह जमीनवरूनही कारवाई सुरूच ठेवली आहे. हमासला लक्ष्य करून हे हल्ले सुरू असल्याचे लष्कराकडून सांगितले जात आहे. याच वेळी, लेबनीज सीमेवरही तणाव वाढला आहे. हिजबुल्लाला लक्ष्य करत इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात लेबनीज लष्कराचे तीन सैनिक ठार झाले आहेत. लेबनीज लष्कराने ही माहिती दिली असून, दक्षिणेकडील भागात त्यांच्या वाहनावर इस्रायलने हल्ला केला होता. मात्र या हल्ल्याबाबत इस्रायली सैन्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

जागतिक पातळीवर चिंतेत वाढ

गाझा आणि लेबनीज सीमेवरील या ताज्या घटनांमुळे इस्रायल आणि हमास तसेच हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक पातळीवर चिंता वाढत चालली आहे. तसेच एकीकडे रशिया-युक्रेनमध्ये देखील संघर्ष तीव्र होत चालला आहे.