मोहाली : मोहाली येथील जिल्हा न्यायालयाला सोमवारी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संपूर्ण कोर्ट कॉम्प्लेक्स रिकामा केला. खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी ३ वाजेपर्यंत परिसरात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिस, बॉम्ब शोधक पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन सखोल तपासणी करत आहेत.
दरम्यान, चंदीगड आणि जालंधरमधील अनेक शाळा व सरकारी इमारतींनाही ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्याने खळबळ उडाली. चंदीगड विद्यापीठ, गांधी भवन यांसह विविध ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून तपास यंत्रणा सतर्क झाली आहे.
जालंधरमध्ये डीपीएस, मेयर वर्ल्ड स्कूल आणि एमजीएन स्कूलला सकाळी सुमारे ८ वाजता धमकीचा ईमेल प्राप्त झाला. या ईमेलमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरत “तुमच्या मुलांना वाचवा” असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी सर्व शाळांमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
Related News
विशेष म्हणजे, जालंधरमधील एमजीएन स्कूल सुरू ठेवण्यात आले असले तरी इतर ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून शोधमोहीम राबवली जात आहे.दरम्यान, या धमकीच्या ईमेलमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना उडवण्याची धमकी देण्यात आल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे.मुख्यमंत्री मान यांनी या घटनेची दखल घेत, “धमकी हलक्यात घेतली जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल,” असे स्पष्ट केले आहे.
