नांदेडमध्ये रक्तरंजित गँगवार: सिनेमातून बाहेर पडताच तरुणाचा खून, भावाने रुग्णालयात घेतला बदला

गँगवार

नांदेड : शहरात शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या थरारक गँगवारने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. जुन्या वैमनस्यातून दोन गट आमनेसामने आले आणि तलवार, खंजरच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल असलेल्या आरोपीचा देखील बदला घेण्यासाठी थेट रुग्णालयात घुसून खून करण्यात आला.

या प्रकरणातील मृतांची नावे आराजितसिंह चव्हाण, सय्यद अवेज आणि महंमद अरबाज अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात साई लाला गँग आणि अनिल पंजाबी गँग यांच्यात मागील काही दिवसांपासून तणावाचे वातावरण होते. छोट्या-छोट्या कारणांवरून सुरू झालेला वाद हळूहळू गंभीर स्वरूप धारण करत होता.

शुक्रवारी रात्री आराजितसिंह चव्हाण हा आपल्या मित्रांसोबत “धुरंधर 2” हा सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट संपल्यानंतर तो थिएटरमधून बाहेर पडताच दुसऱ्या गँगमधील सदस्यांनी त्याच्यावर पाळत ठेवून हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. दोन्ही गटातील सदस्यांनी तलवारी आणि खंजरने एकमेकांवर सपासप वार केले.

Related News

या हल्ल्यात आराजितसिंह चव्हाण आणि महंमद अरबाज यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, इथेच या घटनेने आणखी एक भीषण वळण घेतले.आराजितसिंहच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचा लहान भाऊ थेट रुग्णालयात पोहोचला. जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या सय्यद अवेजवर त्याने खंजरने डोक्यात वार केला. या हल्ल्यात अवेजचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने पोलिस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, मयत आराजितसिंह चव्हाण हा स्थानिक राजकारणात सक्रिय होता. त्याने शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिकेची निवडणूकही लढवली होती, मात्र त्याला पराभव स्वीकारावा लागला होता. त्याच्यावर जिल्ह्यात एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर महंमद अरबाजवरही पाच ते सहा गुन्हे नोंद आहेत.

या गँगवारची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील चार संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. जुन्या वैमनस्यातून उफाळून आलेल्या या हिंसाचारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, अशा गँगवारवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे नांदेडमधील गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. छोट्या कारणांवरून होणारे वाद, त्यातून उफाळणारी हिंसा आणि शेवटी होणारे जीवितहानीचे प्रकार हे शहरासाठी गंभीर चिंतेचे कारण ठरत आहेत.

पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कायदा हातात न घेता कोणतीही माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असेही सांगितले आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/shocking-type-of-unauthorized-cafe-starts-in-womens-pink-toilet-in-mumbai-police-takes-immediate-action/

Related News