महावितरण बुटीबोरी विभागात महिला दिन उत्साहात; महिला कर्मचाऱ्यांचा गौरव

बुटीबोरी

महावितरणच्या बुटीबोरी विभागात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात; महिला कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव

महावितरणच्या बुटीबोरी विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व महिला अधिकारी, अभियंता आणि कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक ‘मंगलया सेलिब्रेशन हॉल’ येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांच्या कार्यालयीन योगदानाचे कौतुक करण्यासोबतच त्यांच्यातील सुप्त गुणांना दाद देण्यात आली.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक गाणार, उपकार्यकारी अभियंता (बुटीबोरी) प्रशांत चरपे, उपकार्यकारी अभियंता (हिंगणा) भुपेंद्र रनध्ये, गणेश डोरले आणि प्रमोद सोनारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

महिला कर्मचाऱ्यांच्या प्रतिभेला आणि सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सहायक अभियंता स्वीटी सहारे,मयूरी काळे आणि पियूशी चांदेकर यांनी विविध मनोरंजक खेळांचे नियोजन केले होते. या स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला, तर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी बोलताना कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या कामातील तत्परतेचे आणि चिकाटीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक महिला कर्मचाऱ्यांनीही आपल्या मनोगतातून कार्यालयीन अनुभव आणि महिला दिनाचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाचे संचालन एमआयडीसी उपविभाग-1 च्या सहायक अभियंता हेमांगी गजभिये यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहायक अभियंता अमृता नेटके यांनी मानले.

read also:https://ajinkyabharat.com/mahavitaranchis-strong-action-crime-of-theft-of-malkavar-veg-from-pitachya-chakki/