लग्नाचे बेत रद्द, जेवणाचेही वांदे; व्यावसायिक गॅस टंचाईमुळे महाराष्ट्रातील हॉटेल उद्योग कोलमडला
महाराष्ट्रात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम हॉटेल, केटरिंग आणि अन्नपुरवठा क्षेत्रावर होताना दिसत आहे. पुणे, ठाणे, नागपूर, सोलापूर आणि धुळे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये अनेक प्रसिद्ध हॉटेल्सना गॅसअभावी तात्पुरते बंद ठेवावे लागले आहे. काही ठिकाणी हॉटेल्स मर्यादित पदार्थांवर चालू आहेत, तर काही ठिकाणी इलेक्ट्रिक शेगड्यांच्या सहाय्याने स्वयंपाक करण्याची कसरत सुरु आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात गॅस टंचाई निर्माण झाल्याने केटरिंग व्यवसायिकांनाही मोठा फटका बसला असून अनेकांनी आधी घेतलेल्या ऑर्डर्स रद्द करण्याची वेळ आली आहे. या संपूर्ण परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांच्या जेवणाच्या ताटावरही परिणाम होताना दिसत आहे.
मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. त्याचा परिणाम आता थेट महाराष्ट्रात दिसून येत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा अचानक खंडित झाल्याने अनेक शहरांतील हॉटेल व्यवसाय अक्षरशः ठप्प झाला आहे. राज्यातील अनेक प्रसिद्ध हॉटेल्सनी “गॅस उपलब्ध नाही” असे फलक लावून व्यवसाय बंद ठेवला आहे. यामुळे रोज हजारो ग्राहकांना निराश होऊन परत जावे लागत आहे.
मुंबईतील ऐतिहासिक हॉटेलवरही संकट
मुंबईतील खाद्यसंस्कृतीचे एक महत्त्वाचे प्रतीक मानले जाणारे फोर्ट परिसरातील १७८ वर्षे जुने “पंचम पुरीवाला” हॉटेलही या संकटातून सुटलेले नाही. १८४८ पासून सुरु असलेल्या या हॉटेलमध्ये साधारण ७९ प्रकारचे पदार्थ मिळत असत. मात्र सध्या गॅसच्या कमतरतेमुळे येथे केवळ “पुरी-भाजी” आणि “आमरस-पुरी” असे दोनच पदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत. मर्यादित गॅस साठ्यामुळे व्यवस्थापनाला ओळखीच्या लोकांकडून सिलेंडरची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे हॉटेलच्या दैनंदिन उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे.
पुणे-ठाण्यातील प्रसिद्ध हॉटेल्स बंद
पुण्यातील खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले प्रसिद्ध “बादशाही” हॉटेल गॅसअभावी बंद ठेवण्यात आले आहे. हॉटेलच्या बाहेर गॅस संपल्याचा फलक लावण्यात आल्याने ग्राहकांना परत जावे लागत आहे. अनेक खवय्ये रोज या हॉटेलमध्ये येत असत, मात्र सध्या त्यांना निराश होऊन दुसरीकडे वळावे लागत आहे.
ठाण्यातील परिस्थितीही काही वेगळी नाही. कोपरी येथील “शिवम” हॉटेल गॅसअभावी बंद करण्यात आले आहे. सध्या येथे केवळ इलेक्ट्रिक शेगडीवर सँडविच आणि पिझ्झा तयार करून दिले जात आहेत. मात्र चहा, नाश्ता आणि जेवणाची सेवा बंद झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे खोपट एसटी डेपोतील कॅन्टीनमध्येही गॅस उपलब्ध नसल्याने चालक, वाहक आणि प्रवाशांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपुरात मंत्र्यांच्या जेवणावरही संकट
नागपुरातील खापरी येथील एलपीजी बॉटलिंग प्लांटमधून व्यावसायिक सिलेंडरचे वितरण पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. सध्या केवळ घरगुती सिलेंडरच्या पुरवठ्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे व्यावसायिक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मंत्र्यांचे वास्तव्य असलेल्या रवि भवन येथील व्हीव्हीआयपी कॅन्टीनलाही गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी येत आहेत. परिणामी येथे चार इलेक्ट्रिक शेगड्यांच्या सहाय्याने जेवण बनवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
लग्नसराईत केटरर्स हतबल
ऐन लग्नसराईच्या काळात गॅस टंचाई निर्माण झाल्याने केटरिंग व्यवसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. नागपूरचे केटरर दीपक मिश्रा यांनी सांगितले की, हजारो लोकांसाठी चुलीवर जेवण बनवणे शक्य नाही. त्यामुळे आम्हाला घेतलेल्या अनेक ऑर्डर्स रद्द कराव्या लागत आहेत. काही ग्राहकांना ॲडव्हान्स पैसेही परत करावे लागत आहेत. यामुळे केटरिंग व्यवसायाशी संबंधित मजूर, स्वयंपाकी आणि इतर कामगारांचेही रोजगार धोक्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या जेवणावर प्रश्नचिन्ह
भंडारा जिल्ह्यातील एका डिफेन्स अकॅडमीमध्ये दररोज सुमारे १२०० विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवले जाते. मात्र सध्या येथे केवळ दोन दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. गॅसचा पुरवठा लवकर सुरु झाला नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांसाठी चुलीवर जेवण कसे बनवायचे, असा प्रश्न शाळा प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
धुळे आणि सोलापुरातील लहान व्यावसायिक संकटात
धुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले की, उन्हाळ्याच्या कडाक्यात चुलीवर काम करणे कामगारांना शक्य नाही. त्यामुळे गॅस उपलब्ध नसल्यास हॉटेल चालवणे अशक्य होईल. सोलापुरातील छोटे हॉटेल व्यावसायिक बळीराम जांभळे यांच्यासारख्या अनेकांचे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यांच्या कुटुंबातील २१ सदस्यांचा उदरनिर्वाह हॉटेल व्यवसायावर चालतो. गॅस टंचाई कायम राहिली तर त्यांचे उत्पन्न पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घरगुती ग्राहकांमध्येही भीती
व्यावसायिक गॅस टंचाईची बातमी समोर आल्यानंतर घरगुती ग्राहकांमध्येही चिंता वाढली आहे. रत्नागिरीमध्ये अनेक नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. शांतादुर्गा गॅस एजन्सीबाहेर पाच-पाच दिवस नागरिक रांगेत उभे राहत असल्याचे सांगितले जात आहे. भविष्यात घरगुती गॅस पुरवठ्यावरही परिणाम होईल या भीतीने अनेकजण आगाऊ बुकिंग करण्यासाठी गर्दी करत आहेत.
पुरवठा कधी सुरळीत होणार?
गॅस टंचाईमुळे राज्यातील हॉटेल, केटरिंग आणि अन्नपुरवठा क्षेत्रावर मोठे संकट आले आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पुन्हा नियमित कधी होणार याबाबत स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नाही. मात्र परिस्थिती लवकर सुरळीत झाली नाही तर हॉटेल व्यवसाय, लग्नसराई आणि विद्यार्थ्यांच्या अन्नपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकार आणि संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्याची गरज असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.
