Solapur : बाथरूममध्ये 18 सिगारेटची थोटकं, खिशात मराठी चिठ्ठी, CDR आणि टॉवर लोकेशनमुळे तपासाला वेग.

सिगारेट

सोलापूर : शहरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन Dr. Shirish Valsangkar यांच्या मृत्यू प्रकरणातील गूढ अजूनही कायम आहे. १८ एप्रिल २०२५ रोजी राहत्या घरी गोळी झाडून त्यांनी आयुष्य संपवल्याची घटना घडली होती. मात्र या घटनेनंतर तब्बल दहा महिने उलटून गेले तरी आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणात आता मोबाईल सीडीआर आणि टॉवर लोकेशनच्या माहितीमुळे नवा ट्विस्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात सरकार पक्षाने डॉ. वळसंगकर, त्यांचे पुत्र Dr. Ashwin Valsangkar तसेच इतर साक्षीदारांच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि टॉवर लोकेशनची माहिती बंद लिफाफ्यात सीडीच्या स्वरूपात न्यायालयात सादर केली आहे. या सीडीच्या प्रती आरोपी पक्षाला मिळाव्यात यासाठी आरोपी Manisha Musale Mane यांच्या वतीने वकील Adv. Prashant Navgire यांनी मागील सुनावणीवेळी न्यायालयात अर्ज केला होता.

हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश Manoj Sharma यांनी मंजूर करत सरकार पक्षाला सीडीच्या प्रती आरोपी पक्षाला देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवारी या सीडी आरोपी पक्षाला मिळण्याची शक्यता असून या माहितीमुळे तपासात आणखी नवे तपशील समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related News

मोबाइल कॉल डिटेलमध्ये संशयास्पद संभाषण

पोलीस तपासादरम्यान मिळालेल्या मोबाईल सीडीआरमधून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. १३ एप्रिल २०२५ रोजी एका विशिष्ट मोबाईल नंबरवरून डॉ. वळसंगकर यांच्याशी चार वेळा संभाषण झाले होते. त्यानंतर १५ एप्रिल रोजी त्या नंबरवरून तब्बल आठ वेळा फोन कॉल झाल्याची नोंद सीडीआरमध्ये आहे. या वारंवार झालेल्या संभाषणांमुळे तपास यंत्रणांचे लक्ष त्या नंबरकडे वळले आहे.

घटनेच्या दिवशी डॉक्टर बराच वेळ एकटे

१८ एप्रिल २०२५ रोजी डॉ. वळसंगकर दवाखान्यातील काम आटोपून रात्री सुमारे पावणेनऊ वाजता घरी परतले. त्यानंतर ते घरातील बेडरूममध्ये बराच वेळ एकटेच होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. काही वेळाने त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना काही धक्कादायक बाबी आढळल्या. घरातील बाथरूममध्ये तब्बल १८ सिगारेटची थोटकं सापडली. इतक्या मोठ्या प्रमाणावर सिगारेट ओढल्यामुळे डॉक्टर त्या दिवशी मानसिक तणावात होते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच ज्या पिस्तुलातून त्यांनी गोळी झाडली, ती बंदूक त्यांच्या बेडरूममधील कपाटातून जप्त करण्यात आली होती, असेही पंचनाम्यात नमूद आहे.

खिशात सापडली मराठीत लिहिलेली चिठ्ठी

या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे डॉ. वळसंगकर यांच्या खिशात सापडलेली मराठीत लिहिलेली शेवटची चिठ्ठी. या चिठ्ठीच्या आधारे त्यांच्या मुलाने म्हणजेच डॉ. अश्विन वळसंगकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर रुग्णालयातील कर्मचारी मनीषा मुसळे माने यांना सदर बझार पोलिसांनी अटक केली होती.

पोलीस तपासादरम्यान अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून पोलिसांनी तब्बल ७२० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रामध्ये मोबाईल कॉल डिटेल, साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक तपशीलांचा समावेश आहे.

दहा महिन्यांनंतरही प्रश्न अनुत्तरित

डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन म्हणून ओळखले जात होते. अनेक रुग्णांना त्यांनी उपचार देत आयुष्य दिले होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र इतका कालावधी उलटूनही आत्महत्येमागील नेमके कारण समोर आलेले नाही.आता मोबाईल सीडीआर आणि टॉवर लोकेशनच्या माहितीच्या प्रती आरोपी पक्षाला मिळाल्यानंतर या प्रकरणात नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील सुनावणीदरम्यान या प्रकरणात काय नवीन माहिती उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

read also :   https://ajinkyabharat.com/surat-news-two-girlfriends-commit-suicide-in-surat-chatgpt-search-history-found-in-mobile/

Related News