फेक सोशल मीडिया अकाउंटद्वारे महिलांचे अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल; पुण्यातील तरुणावर मूर्तिजापूरमध्ये गुन्हा

सोशल मीडिया

मूर्तिजापूर : सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून महिलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश लक्ष्मण कांबळे (वय 35, रा. पिंपरी चिंचवड, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपीने फिर्यादीच्या मैत्रिणीच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार केले होते. या अकाउंटचा वापर करून फिर्यादी तसेच तिच्या मैत्रिणीचे अश्लील मजकूर असलेले फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करण्यात आले.

हा धक्कादायक प्रकार 15 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सोशल मीडियावर संबंधित मजकूर आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर फिर्यादीला याची माहिती मिळाली. यामुळे तिची व तिच्या मैत्रिणीची मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले तसेच त्यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

Related News

दरम्यान, फिर्यादीने आरोपीला फोन करून याबाबत जाब विचारला असता, आरोपीने चूक मान्य करण्याऐवजी आणखी अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या धमकीमुळे फिर्यादी अधिकच घाबरली असून तिने तत्काळ पोलिसांकडे धाव घेत न्याय मागितला.

या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलमांनुसार तसेच महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचविणाऱ्या कृत्यांबाबत लागू असलेल्या कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.


“महिलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी घ्यावी तसेच अशा प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी.”अजित जाधव, पोलिस

अजित जाधव, पोलिस निरीक्षक, मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन 

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर अनोळखी अकाउंट्सकडून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत, वैयक्तिक फोटो किंवा माहिती शेअर करताना विशेष काळजी घ्यावी. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी सांगितले.

या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून सायबर गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/ladki-bahin-yojana-ekyc-deadline-extended-2026-motha-dilasa-last-date-till-31st-march-important-decision-of-the-government-for-women/

Related News