आदर्श शाळेत “प्लास्टिक वापर कमी करा, कापड-कागदाच्या पिशव्या तयार करा” उपक्रम संपन्न

आदर्श

चंद्रपूर, दि. 22 जानेवारी: पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर आणि आदर्श हायस्कूल, राजुरा येथे “प्लास्टिक वापर कमी करा, कापड-कागदाच्या पिशव्या तयार करा” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम सामाजिक वनीकरण विभाग, परिक्षेत्र राजुरा आणि राष्ट्रीय हरित सेनाच्या सहकार्याने संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभुळकर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सुनील मेश्राम, वनपाल, सामाजिक वनीकरण विभाग राजुरा, नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, आणि वैशाली चिमुरकर, सहायक शिक्षिका उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्याऐवजी पर्यावरणपूरक कापड व कागदी पिशव्या कशा तयार करता येतात, याचे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी घरी असलेल्या टाकावू कापडापासून सुंदर पिशव्या तयार केल्या आणि त्या शाळेत गोळा करून एकत्रित करण्यात आल्या. कागद व कापडी पिशव्या तयार करण्याच्या तंत्राबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले गेले.

अतिथींनी विद्यार्थ्यांना उद्दिष्ट ठेवून मार्गदर्शन करत सांगितले की, बदल लहान कृतींपासून सुरू होतो, पण जेव्हा आपण एकत्र काम करतो, तेव्हा त्याचा परिणाम दीर्घकालीन आणि प्रभावी ठरतो. सततचे छोटे प्रयत्न एकत्र केल्यास पृथ्वी आणि पर्यावरणासाठी मोठे बदल साधता येतात. कार्यक्रमात सारिपुत्र जांभुळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सांगितले, “प्लास्टिकचा वापर कमी करा, शाश्वतेला प्राधान्य द्या.”

उपक्रमाच्या सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बादल बेले यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव आणि पर्यावरण संबंधित क्षेत्रभेटी आयोजित करण्यात आल्या. या भेटींमध्ये निसर्गातील विविध घटकांचे महत्त्व, त्यांचे कार्य, तसेच पशु-पक्षी व वन्यजीवांची ओळख व जीवनशैली याची सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाची सांगता प्लास्टिक मुक्त जीवन जगणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे या प्रतिज्ञेने करण्यात आली. विद्यार्थ्यांना कागद व कापडी पिशव्या स्वतः वापरण्यासह इतरांना या उपक्रमासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले.

शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि अतिथी यांचे एकत्रित सहकार्य या उपक्रमाला यशस्वी बनवले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रती संवेदनशीलता वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून, भविष्यातील पिढ्यांसाठी प्लास्टिक विरहित आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या दिशेने एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल.

read also :  https://ajinkyabharat.com/the-first-experiment-of-kapus-vechani-through-akot-talukyat-instrument-was-successful/