बाळापूर : बाळापूर शहराच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास एक मारोती ओमनी गाडी अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अंजुमन कॉलेजजवळ, खतीबॉल समोर रस्त्याने जात असताना ही घटना घडली. एमएच 28 V 2268 क्रमांकाची ही गाडी चालू अवस्थेत असताना अचानक धुराचे लोट निघू लागले आणि क्षणार्धात गाडीने पेट घेतला.
गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच चालकासह गाडीतील प्रवासी तात्काळ खाली उतरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडी शहराच्या मध्यभागी आणि वर्दळीच्या ठिकाणी पेट घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळासाठी रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.
या गाडीमध्ये सीएनजी गॅस असल्याची चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती. त्यामुळे आग अधिक भडकण्याची आणि मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने लोकांमध्ये भीती पसरली. विशेष म्हणजे, गाडी विजेच्या खांबाखालीच पेट घेतल्याने शॉर्टसर्किट किंवा स्फोट होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवत घटनास्थळापासून दूर राहणे पसंत केले.
Related News
घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसर सुरक्षित केला. त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. आग कशामुळे लागली, याबाबत नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाड किंवा वायरिंगमधील दोषामुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
वृत्तलेखनापर्यंत सदर गाडीचा मालक कोण आहे, तसेच गाडी कुठून आली होती व कुठे जात होती, याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून याबाबत सखोल चौकशी सुरू असून, गाडीच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेमुळे काही काळ शहरात अफवांचे वातावरणही निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारची घटना घडल्याने वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः सीएनजी व एलपीजी वाहनांची नियमित तपासणी, तसेच तांत्रिक देखभाल वेळेवर होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया
“गाडी शहरात कुठून आली व कुठे जात होती, याची माहिती आम्ही गोळा करीत आहोत. नागरिकांमध्ये भीती राहू नये, यासाठी पोलीस सदर गाडीबाबत सखोल चौकशी करीत आहेत.”
— संभाजी हिवाळे,
पोलीस उपनिरीक्षक,
बाळापूर पोलीस स्टेशन
read also : https://ajinkyabharat.com/moffat-health-checkup-camp-at-saundla-275-patients-checkup/
