तिथेही अनेक एकनाथ शिंदे, ते आमच्या संपर्कात; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

एकनाथ शिंदे

भुवनेश्वर: लोकसभा निवडणूक सुरु असताना ओदिशामध्ये बीजू जनता दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. भाजपकडून बीजदला फोडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर बीजदमध्ये सगळेच काही गुलाम नाहीत. त्यांच्या पक्षात अनेक एकनाथ शिंदे आहेत, असं विधान भाजपचे नेते समीर मोहंती यांनी केलं. यानंतर बीजदच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘बीजू जनता दलामध्ये सगळेच काही गुलाम नाहीत. त्यांच्या पक्षात अनेक एकनाथ शिंदे आहेत,’ असं विधान भाजप नेते समीर मोहंती यांनी केलं. बीजदचे नेते व्ही. के. पांडियन यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले. ‘बीजदमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. भाजपनं विधानसभा निवडणुकीत ४० ते ५० जागा जिंकल्यास त्यांच्याकडून राज्यातलं बीजद सरकार पाडण्यात येईल,’ असा खळबळजनक दावा पांडियन यांनी केला.

पांडियन यांच्या आरोपांना भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष समीर मोहंती यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘मुख्यमंत्र्यांचे हाऊस मॅनेजर सेफॉलॉजिस्ट कधीपासून झाले? पांडियन मुख्यमंत्र्यांचे रिमोट कंट्रोल आहेत का?’ असे सवाल मोहंतींनी उपस्थित केले. ‘आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप ५० जागा जिंकणार असल्याचं पांडियन खात्रीपूर्वक सांगत आहेत. मग ४ जूनला काय होणार हेदेखील त्यांना माहीत असेल,’ असा टोला मोहंती यांनी लगावला.

Related News

‘बीजदमध्ये सगळेच गुलाम नाहीत. त्यांच्या पक्षात अनेक एकनाथ शिंदे आहेत. ते आमच्या सतत संपर्कात आहेत. आपल्या पायाखालची जमीन सरकतेय याची बीजदला कल्पना आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष याआधीच या एकनाथ शिंदेंबद्दल बोलले आहेत. त्यात नवीन काहीच नाही,’ असं मोहंती म्हणाले. ओदिशा अस्मितेची जाणीव असलेले नेते जास्त काळ गुलाम म्हणून राहू शकणार नाहीत, असंही त्यांनी पुढे म्हटलं.

Related News