ट्रॉफी परत न केल्यास थेट जेलमध्ये जाण्याची शक्यता

भारताची ट्रॉफी अजून PCB कडेच!

आशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत जेतेपद पटकावलं. मात्र, सामना संपल्यानंतरही भारतीय संघाला आपल्या हक्काची विजयी ट्रॉफी आणि मेडल्स मिळाली नाहीत. कारण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी ही ट्रॉफी ताब्यात घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) कडून या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, आता मोहसिन नक्वी यांना 72 तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. या वेळेत त्यांनी ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषद (ACC) कार्यालयात परत न केल्यास त्यांच्यावर थेट दुबई पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु आहे. सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने मैदानात थांबूनही ट्रॉफी मिळण्याची वाट पाहिली, मात्र ट्रॉफीचा मागमूस न लागल्याने संघाला ट्रॉफीशिवायच विजयाचा जल्लोष साजरा करावा लागला. या प्रकारानंतर बीसीसीआयने तातडीने एसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. बैठकीत अनेक देशांनी मोहसिन नक्वी यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध नोंदवला. सूत्रांच्या माहितीनुसार, मोहसिन नक्वी यांनी अद्याप ट्रॉफी ना भारताकडे, ना एसीसी कार्यालयात सुपूर्द केली आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्यांच्याविरुद्ध “ट्रॉफी चोरी आणि जबरदस्तीने ताब्यात ठेवणे” या गुन्ह्यांखाली तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. जर मोहसिन नक्वी यांनी ठराविक वेळेत ट्रॉफी परत केली नाही, तर दुबई पोलिसांकडे गुन्हा नोंदवला जाईल आणि त्यांना अटक होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. आता मोहसिन नक्वी पुढील काही तासांत काय निर्णय घेतात, याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागलं आहे.

read also:https://ajinkyabharat.com/arogya-hitch-khari-sampathi/