डाटा एन्ट्री ऑपरेटर नेमण्याची तातडीची मागणी

आरोग्य सेवक-सेविकांवरचा कामाचा ताण कमी करण्यासाठी तंत्रज्ञांची नियुक्ती आवश्यक

अकोला – महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने अकोला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्रावर डाटा एन्ट्री ऑपरेटर नेमण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला, श्रीमती अनिता मेश्राम यांच्याकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेविका आणि सेवकांना ग्रामीण भागातील आरोग्य सेवा देताना अनेक प्रकारच्या डाटा एन्ट्रीचे कामे पार पाडावी लागतात. परंतु उपकेंद्र स्तरावर कम्प्युटर आणि प्रिंटर उपलब्ध असले तरी त्यांना हाताळण्यासाठी स्वतंत्र ऑपरेटर नियुक्त केलेले नाहीत. त्यामुळे आरोग्य कर्मचारी स्वतःच ऑपरेटरसारखी कामे करत आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा प्रभावित होत आहे. संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संगीता जाधव यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून विविध संगणक कामे आरोग्य कर्मचाऱ्यांवर लादली जात आहेत. या जबाबदाऱ्या अन्यायकारक पद्धतीने लादल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन धोक्यात आले आहे. यामुळे शासनाने आरोग्यसेवा देण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांवर चुकीच्या दबावाचे तंत्र वापरले जात आहे. यावेळी निवेदन देताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा सल्लागार वृंदा ताई विजयकर, जिल्हा सदस्य मंगला भगत, जिल्हा सहसचिव अनिता इंगळे, जिल्हा मार्गदर्शक महादेव तायडे आणि जिल्हा सह उपाध्यक्ष क्षमाताई बायस्कर उपस्थित होत्या. संघटनेने उपकेंद्र स्तरावर स्वतंत्र डाटा एन्ट्री ऑपरेटर नेमण्याची तातडीची विनंती केली आहे.

read also:https://ajinkyabharat.com/2000-hoon-more-shelkkari-overcrowded-madatipasoon-deprived/