2025 च्या आशिया कपदरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नकवी हे त्यांच्या वादग्रस्त कृतींमुळे आणि विधानांमुळे सतत चर्चेत राहिले. परंतु आता त्यांच्या कामगिरीमुळेच त्यांच्यावर पद गमावण्याची वेळ आली आहे. टीम इंडियाकडून झालेला सलग तिसरा पराभव आणि आशिया कप फायनलमधील पराभवानंतर पाकिस्तानमध्ये चाहत्यांनी आणि माजी खेळाडूंनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. भारताने ट्रॉफी जिंकल्यानंतर पाकिस्तानात नकवी यांच्यावर जोरदार टीका होत असून, त्यांना पदावरून हटवण्याची मागणी सुरू झाली आहे. PCB आणि आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) या दोन्ही पदांवर असलेले मोहसिन नकवी यांना फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरच नव्हे, तर स्वतःच्या देशातही अपमानाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान यांनी तर थेट टीका करताना म्हटले – “जे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पाकिस्तानचं केलं, तेच नकवी यांनी पाकिस्तानच्या क्रिकेटचं केलं!” मुनीर यांच्या कार्यकाळात जसे सैन्याला पराभव पत्करावा लागला, तसेच पाकिस्तानी संघालाही सर्वच फॉरमॅटमध्ये पराभवाचा सामना करावा लागत आहे, असा आरोप इम्रान खान यांनी केला. इम्रान खान यांच्या पक्षाने (PTI) स्पष्ट शब्दांत मोहसिन नकवी यांच्यावर क्रिकेट उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. पक्षाचे नेते मुनीस इलाही यांनी सोशल मीडियावर ‘निर्वाचित’ पंतप्रधान शहबाज शरीफ यांना आव्हान दिलं –“हिम्मत असेल तर मोहसिन नकवींवर कारवाई करा!” नकवी यांची नियुक्ती शहबाज शरीफ यांनीच केली होती, त्यामुळे आता राजकीय दडपणही वाढले आहे. पाकिस्तानचा प्रत्येक फॉरमॅटमधील खराब परफॉर्मन्स, आशिया कपमधील अपयश आणि सततच्या वादांमुळे PCB वर प्रश्नचिन्हं निर्माण झाली आहेत. आता मोहसिन नकवी आपलं पद टिकवू शकतात का, की त्यांना खुर्ची गमवावी लागेल, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
महत्त्वाचं: चाहत्यांचा संताप वाढला असून पाकिस्तानात “नकवी आऊट” अशी मागणी जोर धरत आहे!
read also:https://ajinkyabharat.com/india-america-relationship-care/
