भारताने खेचून आणला विजयाचा घास

सामना हातात असल्याचं वाटलं… पण विजय भारताचा!

आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानच्या घशातून विजयाचा घास खेचून आणला. एक क्षण पाकिस्तानच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण भारतीय फलंदाजांनी अचूक खेळ करत सामन्याचं पारडं आपल्या बाजूला ओढलं. सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने पराभवाची कबुली देत स्वतःच्या संघावर टीका केली. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. पाकिस्तानने 19.1 षटकांत सर्वबाद 146 धावा करत भारतासमोर 147 धावांचं लक्ष्य ठेवलं. सामन्याच्या सुरुवातीला भारताने पॉवर प्लेमध्ये तीन महत्त्वाच्या विकेट गमावल्या आणि सामना कठीण झाला. पण तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी जबाबदारी स्वीकारत खेळ स्थिर केला आणि पाकिस्तानच्या विजयाच्या स्वप्नांवर पाणी फेरलं. सामन्यानंतर बोलताना सलमान आघा म्हणाला, “पराभव गिळणे कठीण आहे. आम्ही फलंदाजीत चांगले खेळू शकलो नाही, पण आमच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. आम्ही स्ट्राईक योग्यरित्या रोटेट केली नाही आणि झटपट विकेट गमावल्या. त्यामुळे आम्हाला पाहिजे ते साध्य करता आलं नाही. एक क्षण मला वाटलं सामना आमच्या हातात आहे.” त्याने पुढे सांगितले, “जेव्हा भारताला 6 षटकांत 63 धावांची गरज होती, तेव्हा आम्हाला विजय निश्चित वाटत होता. पण भारतीय फलंदाजांनी दबावाखाली जबरदस्त खेळ केला. आमच्या गोलंदाजांचा मला अभिमान आहे. आम्ही आमच्या चुका सुधारून अधिक मजबूत होऊन परतू.” या विजयासह भारताने पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा पराभूत करत नवव्यांदा आशिया कपचे जेतेपद पटकावले. भारतीय गोलंदाज आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांनी दाखवलेला संयम आणि आत्मविश्वास हा विजयाचा मुख्य घटक ठरला. भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की “खेळ शेवटच्या चेंडूपर्यंत संपत नाही.

read also:https://ajinkyabharat.com/vidyarthayana-dila-social-janivecha-dhada/