चाळीसगावात पूरस्थिती गंभीर

जळगावात ढगफुटी सदृश्य परिस्थिती

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. डोंगरी आणि तितुर या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून नदीकाठच्या भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. रात्रीपासून शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे व्यापारी, दुकानदार आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त नागरिक पंचनामे आणि तातडीची आर्थिक मदत मागत आहेत.

नदीचा रौद्रावतार – शहर पाण्याखाली: चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या नद्यांना आलेल्या महापुरामुळे हिरापूर रोडवरील बेतमुथा कॉम्प्लेक्समधील ९ दुकाने संपूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. धुळे रोड परिसरातील आदर्श कॉलनीसह अनेक घरांमध्ये आणि व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरले आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून तातडीने पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांनी नुकसानग्रस्त मालाचा पंचनामा करून तातडीने भरपाई देण्याची मागणी केली आहे.

वीजपुरवठा ठप्प – जनजीवन विस्कळीत:रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. पाटणादेवी परिसरातील डोंगरी नदीच्या उगमस्थानावर झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला रौद्ररूप प्राप्त झाले आहे. यामुळे चंडिका देवी मंदिर तात्पुरते दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान: एरंडोल तालुक्यातील अंतुर्ली परिसरात शेतात एक ते दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने मोसंबी, मका, कपाशी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मक्याचे कणीस तुटून पडले, तर मोसंबीची फळे जमिनीवर गळून पडली आहेत. शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी करत आहेत.

प्रशासनाचा इशारा – नागरिक सतर्क राहा:पूरस्थिती गंभीर असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक तरुणांनी धुळे रोड परिसर आणि नदीकाठच्या सखल भागात रेस्क्यू ऑपरेशन करून वयोवृद्ध आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

 प्रशासनाचे आवाहन:“नद्यांच्या काठावर किंवा सखल भागांमध्ये जाऊ नका. अतिवृष्टी कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे.”

read also:https://ajinkyabharat.com/musadhar-pavasamue-pikancha-shambhar-tuke-damage/