एकाची प्रकृती गंभीर
मलकापूर | राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नायगाव फाट्यानजीक असलेल्या बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, आणखी एक तरुण गंभीर अवस्थेत उपचाराधीन आहे. गुरुवारी (दि. २५) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.मृतांमध्ये साजीदखान जलीलखान (२२) व मुस्ताक खान जब्बार खान (३८) यांचा समावेश आहे. तर आरिफ खान बशिर खान (३८) गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिघेही मलकापूर शहरातील मोमीनपुरा पारपेठ प्रभागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हे तिघे घरून बाहेर पडले होते. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास पंपावरील टाकीत गुदमरल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाली. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून, गंभीर जखमी आरिफ खानला आयुष्यमान रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नागरिकांच्या माहितीनुसार, हा बायोडिझेल पंप काही काळापासून बंद होता. अशा परिस्थितीत हे तरुण टाकीत नेमके का गेले होते, स्वच्छतेसाठी गेले की इतर काही कारण होते, याबाबत विविध शंका व्यक्त होत आहेत.या घटनेमुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/kalegavat-smart-meter-protest/