अकोटात अवैध धंद्यांचा कहर ; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी

अकोट शहरात प्रहार मोहिम फोल ?

अकोट : अकोट शहर व ग्रामीण भागात सुरू असलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांना निवेदन देण्यात आले.स्थानिक स्तरावर खुलेआम जुगार, क्लब, दारू व गुटखा विक्रीसारखे अवैध धंदे सुरू असून, यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी कारवाई करून हे धंदे थांबवले होते; मात्र पुन्हा ते सुरू झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.पत्रकारांनी या अवैध धंद्यांवर वृत्त प्रसिद्ध केल्यावर त्यांच्यावर हल्ले झाल्याचा आणि पोलिसांच्या सहकार्याने खोटे गुन्हे दाखल करून दडपशाही करण्यात आल्याचाही गंभीर उल्लेख करण्यात आला आहे. या धंद्यांमुळे अनेक गरीब कुटुंब उद्ध्वस्त होत असून, जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला.‘प्रहार मोहिम’ सुरू असतानाही अकोट तालुक्यात अवैध धंदे जोमात सुरूच असल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. हे धंदे तात्पुरते नव्हे, तर कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुक्याच्या वतीने अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

read also : https://ajinkyabharat.com/patur-vanar-shiksha-chandanatkarsanna-sapa-both-accused-van-kotdit/