हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, महाप्रसादाचा लाभ घेताना भक्तिभावाने नतमस्तक
उंबर्डाबाजार :उंबर्डाबाजार सह पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र अवधुत महाराज संस्थानात २४ सप्टेंबर रोजी पारंपरिक उत्साहात भव्य यात्रा आणि महाप्रसादाचा सोहळा पार पडला. हजारो भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेत, अवधुत महाराज चरणी नतमस्तक होत भक्तिभाव व्यक्त केला.२२ सप्टेंबर रोजी संस्थानात घटस्थापना झाल्यानंतर पहिल्या बुधवारी डोंगरदरीच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात यात्रेचे आयोजन करण्यात आले. दिवसभर ‘अवधुत चिंतन गुरुदेव दत्त’ या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला. विविध गावांमधून आलेल्या भजनी मंडळांनी भजने सादर करून वातावरण अधिकच भक्तिमय केले.यात्रेनिमित्त परिसरात खेळण्यांच्या आणि आवश्यक साहित्याच्या दुकानांनी गर्दी केली होती. चिमुकल्यांनी आकाशपाळण्यात बसून यात्रेचा आनंद लुटला. अनेक भाविकांनी वाहनांची व्यवस्था असूनही पायी प्रवास करण्यास प्राधान्य दिले. पायदळ यात्रेकरूंसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याची व थंडगार सरबताची व्यवस्था केली. त्यामुळे यात्रेचा आनंद अधिक सुखकर झाला.यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी हातोला येथील युवक मंडळींसह उंबर्डाबाजार आणि पंचक्रोशीतील भाविकांनी मोलाचे योगदान दिले.
read also : https://ajinkyabharat.com/paturamadhyaye-dawa-ayurveda-day-week-excitement-sajra/
