कोर्टात संपत्तीचा वाद

संजय कपूर प्रकरणी प्रियाच्या गुप्ततेच्या विनंतीला कोर्टाचा नकार

संजय कपूरच्या मृत्यूपत्राबाबत पत्नी प्रियाच्या मागणीला न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली │ दिवंगत उद्योगपती आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती संजय कपूर यांच्या जवळपास 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून मोठा वाद उभा ठाकला आहे. लंडनमध्ये पोलो खेळताना अचानक त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची पत्नी प्रिया सचदेव कपूर, पहिली पत्नी करिश्मा कपूरची मुलं, आई आणि बहीण यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे.

याप्रकरणी आज (गुरुवार) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. करिश्माच्या मुलांनी प्रियावर संजयचं मृत्यूपत्र लपवून फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कोर्टाने प्रियाला संजयच्या संपूर्ण संपत्तीची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते.

सुनावणीदरम्यान प्रियाच्या वकिलांनी कोर्टाला विनंती केली की मृत्यूपत्र सीलबंद लिफाफ्यात दाखल करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून ही माहिती जनतेपर्यंत व माध्यमांपर्यंत पोहोचणार नाही. मात्र, न्यायाधीशांनी ही मागणी थेट फेटाळली. “कोणत्याही खटल्यात लेखी उत्तर दाखल करताना दुसऱ्या पक्षाला प्रतिदावा करण्यासाठी ही माहिती आवश्यक असते. सीलबंद लिफाफ्यात माहिती ठेवल्यास प्रक्रिया अडचणीत येईल,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

प्रियाच्या वकिलांनी पुढे फक्त दोन पानं सीलबंद स्वरूपात ठेवण्याची मागणी केली, पण न्यायालयाने हाही प्रस्ताव नाकारला. न्यायाधीशांनी म्हटलं की, “समोरच्या पक्षाला मालमत्तेबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. गोपनीयता करारामुळे त्यांचे हक्क बाधित होऊ शकतात.”

दरम्यान, संजय कपूर यांच्या आईच्या वकिलांनीही न्यायालयात भूमिका मांडली. “आम्ही क्लास-1 वारस असल्यामुळे मृत्यूपत्राची स्वतंत्र तपासणी करण्याचा अधिकार आम्हाला आहे. आम्हाला त्याची प्रत देण्यात यावी,” अशी त्यांची मागणी होती.

या सुनावणीत प्रियाच्या वकिलांनी उद्या काही सूचना घेऊन येणार असल्याचे सांगून युक्तिवाद संपवला.