गुरुच्या मृत्यूनंतर शिष्याने कबरीतून शव काढलं,

गुरुच्या

अंधश्रद्धेचा थरार : गुरुच्या मृत्यूनंतर शिष्याने कबरीतून शव काढलं, शीर वेगळं करून झोळीत घेऊन फिरताना गावकऱ्यांनी पकडलं

किशनगंज (बिहार) – अंधश्रद्धा किती भयावह रूप धारण करू शकते, याचे धक्कादायक उदाहरण किशनगंज तालुक्यात उघडकीस आले आहे. तांत्रिकाच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्याने कबरीतून शव बाहेर काढून धारदार शस्त्राने शीर धडापासून वेगळे केले. त्यानंतर हे शीर झोळीत घेऊन तो गावात फिरताना स्थानिकांनी पाहिले आणि रंगेहाथ पकडले.या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपी युवकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

गुरुच्या मृत्यूनंतर थरारक कारनामा

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिजेन राय उर्फ अलगू बाबा नावाचा तांत्रिक लोकांमध्ये परिचित होता. विविध तांत्रिक क्रिया करण्यासाठी अनेक लोक त्याच्याकडे जात. त्याचा १५ दिवसांपूर्वी प. बंगालच्या लाहिल गावात मृत्यू झाला होता आणि त्याचे दफन करण्यात आले होते.त्याच्याकडे शिकणारा २५ वर्षीय शिष्य श्री प्रसाद हा युवक गुरुच्या मृत्यूनंतर बंगालला गेला. त्याने रात्रीच्या सुमारास कबरीवर जाऊन शव बाहेर काढले आणि धारदार हत्याराने गुरुचे शीर वेगळे केले. त्यानंतर हे शीर झोळीत घेऊन तो किशनगंजला परतला.

गावकऱ्यांनी पाहिला थरारक प्रकार

दरम्यान, सकाळी गावकऱ्यांनी अलगू बाबाची कबर उकरलेली पाहिली आणि शीर गायब असल्याचे लक्षात आले. हा प्रकार समजताच गावात खळबळ उडाली.या घटनेनंतर काही तासांतच मडुआ टोली गावात श्री प्रसाद झोळीतून मानवी शीर घेऊन जाताना दिसला. गावकऱ्यांनी त्याला थांबवून विचारणा केली असता, तो घाबरला आणि त्याच्या तोंडून संपूर्ण प्रकार बाहेर आला.गावकऱ्यांनी संतापाच्या भरात त्याला चांगलीच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले.

पोलिसांनी घेतली ताब्यात

युवकाने कबरीतून बाहेर काढलेले शीर बांबूच्या झुडपात लपवून ठेवले होते. पोलिसांनी हे शीर जप्त केले असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.किशनगंज जिल्हा पोलिस अधीक्षक सागर कुमार यांनी सांगितले की, हा गुन्हा प. बंगालच्या हद्दीत घडलेला असल्याने पुढील चौकशीसाठी आरोपीला बंगाल पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

अंधश्रद्धेमुळे गावात भीती

या घटनेमुळे संपूर्ण गावात भीती व दहशतीचे वातावरण आहे. लोकांमध्ये चर्चा सुरू आहे की अंधश्रद्धेच्या नावाखाली मानवी मेंदूत ज्ञान असल्याचा समज करून घेतलेल्या या शिष्याने इतका अमानुष प्रकार घडवला.

read also : https://ajinkyabharat.com/debt-borne-suicide/