सोलापूर – जिल्ह्यातील बार्शी, माढा आणि मोहोळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरं आणि शेती पाण्याखाली गेली आहेत, तर काही भागांमध्ये नागरिकांना वाचविण्यासाठी हेलिकॉप्टर रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.धाराशिवमध्ये काल काही भागात हेलिकॉप्टरद्वारे ग्रामस्थांना एअरलिफ्ट केले गेले होते. तर, आज माढा तालुक्यातही हेलिकॉप्टरच्या गिरक्या पाहायला मिळत आहेत. जिथं कधी काळी नेत्यांच्या हेलिकॉप्टरचे दर्शन घेण्यासाठी गर्दी व्हायची, तिथं आता मुसळधार पावसात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी हेलिकॉप्टर फिरवत आहेत.माढा तालुक्यातील सीना दारफळ येथील बरड वस्तीमध्ये शंभराहून अधिक नागरिक पुरात अडकले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांनंतर येथे हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले.याचबरोबर, माढा तालुक्यातील सीना नदीने करमाळा तालुक्यातील संगोबा येथील आदिनाथ महाराजांच्या मंदिराला पाण्याचा विळखा घालल्याने अनेक ग्रामस्थ अडकले आहेत. संगोबा मंदिरात सुमारे 70 ते 80 नागरिक अडकले असून, त्यांना मदत करण्यासाठी NDRF टीम, बोटी आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.करमाळा तालुक्यातील संगोबा येथे अडकलेल्या 90 ग्रामस्थांना NDRFच्या बोटीने रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे, तसेच महसूल कर्मचारीही अडकल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामस्थांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासन तातडीने कारवाई करत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/banjara-samajachaya-magani-vivan-elgar-reservation-bachawasathi-daml-vajramut/
