शेलूबाजार:गरजू व गरीब रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारे महाआरोग्य तपासणी शिबिर शेलूबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत संपन्न झाले.
हे शिबिर श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल, अमरावती यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे आयोजन रुग्णसेवक शिवा सावके यांनी केले होते.
शिबिराचे उद्घाटन यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. संजयभाऊ देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी वाशिमचे आमदार श्यामभाऊ खोडे, जिल्हा व तालुका पदाधिकारी, शिवसैनिक, आणि शिवआरोग्यसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये बीपी, शुगर, ECG यांसारख्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. एकूण 507 रुग्णांची तपासणी करण्यात आली. अमरावती येथील तज्ज्ञ डॉक्टर डॉ. अनुप डोंगरे, डॉ. धवल, डॉ. शैलेश जायदे, डॉ. दिगंबर, प्रज्ञा मॅडम यांच्यासह मंगरुळपीरचे डॉ. सुनील राऊत यांनी रुग्णांची तपासणी केली.
कार्यक्रमादरम्यान खासदार संजयभाऊ देशमुख यांनी एक रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी आपत्कालीन रुग्णवाहतूक सेवा अधिक सुलभ होणार आहे.
रुग्णसेवा युवा ग्रुपचे सर्व सहकारी, शिवसेनेचे पदाधिकारी शिवा सावके, संतोष लांबाडे, सचिन डोफेकर, शरद कांबे, अरुण उजवने, खंडूभाऊ अंभोरे, दिनेश लोखंडे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली.