नवरात्र उत्सवात भक्तांची वाढलेली गर्दी, पुरातन इतिहास उलगडला जयवंत पुरुषोत्तम
पातुर तालुक्यातील चिचखेड गावाच्या वनराईतील टेकडीवर वसलेले अंबामातेचे भव्य मंदिर हे आज भक्तांसाठी श्रद्धा आणि भक्तीचे प्रमुख केंद्र बनले आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षीदेखील घटस्थापना करून उत्सवाला सुरुवात झाली असून, दूरदूरवरून भक्तांचा ओघ सुरू आहे.
इतिहासाचा धागा : देवीचा दृष्टांत
देशपांडे परिवार परंपरेने दरवर्षी माहूरला रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात असे. मात्र वृद्धापकाळामुळे वारी शक्य न झाल्याने ते दुःखी होते. त्याच वेळी रेणुका मातेने स्वप्नात दृष्टांत देत चिचखेडच्या जंगलातील टेकडीवर मंदिर असल्याचे सांगितले. या दृष्टांतावरून देशपांडे परिवाराने 2011 मध्ये जीर्णोद्धार सुरू केला आणि 2013 मध्ये सभा मंडप व पायऱ्यांचे बांधकाम करण्यात आले.
मंदिराचे आकर्षण
टेकडीच्या पायथ्याशी वाहणारी बोर्डी नदी
नवनाथांच्या मुर्तींसह मंदिर बांधणीचा आराखडा
मुंगसाजी महाराजांचे स्वतंत्र मंदिर
नवरात्र उत्सवात अखंड भजन, होम-हवन व आरत्या
पुरातन जैन मुर्त्यांचा शोध
मंदिर परिसरात सापडलेल्या पुरातन जैन मुनींच्या मुर्त्या देशपांडे परिवाराने सहर्ष जैन समाजाला परत केल्या. यामुळे या मंदिराचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा अधोरेखित झाला आहे.
तीर्थस्थळाची मागणी
अंबामातेच्या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. प्रत्येक नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी हजारो भक्तांचा ओघ वाढत असून, हे ठिकाण श्रद्धास्थानाबरोबरच सांस्कृतिक वारसा जपणारे केंद्र ठरत आहे.
read also :https://ajinkyabharat.com/team-indianla-strong-beauty/
