मुंबई : दोन सिम कार्ड वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातील एक नंबर आधार, पॅनसह लिंक असतो. मात्र दुसरा नंबर ‘बॅकअप’ म्हणून वापरला जातो. अनेक जण या दुसऱ्या नंबरचा रिचार्ज न करता तो तसाच ठेवतात. पण ही निष्काळजीपणा तुमच्यासाठी मोठा डोकेदुखी ठरू शकतो. क्रिकेटपटू रजत पाटीदारप्रमाणे तुमचाही नंबर बंद होऊन दुसऱ्याला दिला जाऊ शकतो.
काय घडलं रजत पाटीदारसोबत?
रजत पाटीदारचा जुना नंबर बंद झाल्यानंतर तो दुसऱ्या ग्राहकाला देण्यात आला. त्या नंबरवर त्याला येणारे कॉल्स, मेसेजेस, अगदी विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सचेही कॉल्स नव्या ग्राहकाला येऊ लागले. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा नंबर खरं तर रजत पाटीदारचाच असल्याचे स्पष्ट झाले.
रिचार्ज न केल्यास धोका कसा?
रिचार्ज न करता नंबर बंद पडल्यास टेलिकॉम कंपनीला तो नंबर दुसऱ्या ग्राहकाला देण्याचा अधिकार असतो. त्यामुळे तुमचे OTPs, बँकिंग व्यवहार, वैयक्तिक कॉल्स दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकतात. यामुळे प्रायव्हसीचा भंग होऊन आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता असते.
ट्रायचे नियम काय सांगतात?
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या नियमांनुसार, रिचार्ज न केलेल्या नंबरला ठराविक कालावधीनंतर बंद करून दुसऱ्या ग्राहकाला वाटप करता येते. हा नियम सर्व टेलिकॉम कंपन्यांवर लागू आहे.
कंपन्यांचे वेगवेगळे नियम
व्होडाफोन-आयडिया (Vi) : सिम 90 दिवस रिचार्जशिवाय सुरू राहतो. त्यानंतर नंबर बंद होऊन दुसऱ्याला दिला जाऊ शकतो. किमान ₹49 चा रिचार्ज आवश्यक.
जिओ (Jio) : 90 दिवसांपर्यंत सिम रिचार्जशिवाय सुरू. त्यानंतर इनकमिंग कॉल थांबवले जातात. दीर्घकाळ रिचार्ज न केल्यास नंबर दुसऱ्याला देण्यात येतो.
एअरटेल (Airtel) : 90 दिवसांनंतर अतिरिक्त 15 दिवसांची मुदत मिळते. मात्र त्यानंतरही रिचार्ज न केल्यास नंबर बंद करून दुसऱ्याला दिला जातो.
त्यामुळे जर तुमच्याकडे ‘ऑप्शनल’ सिम असेल आणि तुम्ही पैसे वाचवण्यासाठी महिनोंमहिने रिचार्ज न करता ठेवला असेल, तर तो नंबर बंद होऊन दुसऱ्याला मिळू शकतो. तुमची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवायची असेल, तर वेळेवर छोटासा रिचार्ज करणं हेच शहाणपण ठरेल.
read also : https://ajinkyabharat.com/42-tasant-risod-poisanchi-kamal/
