चेन्नई : तमिळ चित्रपटसृष्टीतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय कॉमेडी अभिनेता रोबो शंकर यांचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं आहे. चित्रपटाच्या सेटवर बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी रात्री 8.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर यांना काही दिवसांपासून किडनीचा त्रास होत होता. 17 सप्टेंबर रोजी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते अचानक बेशुद्ध पडले. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. आयसीयूमध्ये उपचार सुरू असतानाच गुरुवारी त्यांचं निधन झालं.
शंकर यांनी आपल्या खास ‘रोबोट स्टाईल’ डान्समुळे प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यावरूनच त्यांना ‘रोबो शंकर’ हे टोपणनाव मिळालं. 2000 च्या दशकात छोट्या भूमिका साकारत त्यांनी करिअरची सुरुवात केली. ‘कलक्का पोवथु यारु’मुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘इधारकुथाने आसाइपट्टाई बालकुमारा’, ‘वायाई मूडी पेसावुम’, ‘वेलैनु वंधुट्टा वेल्लैकारन’, ‘कदवुल इरुकान कुमारु’, ‘सिंगम 3’, ‘विस्वासम’, ‘कोबरा’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. धनुषच्या ‘मारी’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली.
आजारीपणामुळे त्यांचं बरंच वजन कमी झालं होतं. रोबो शंकर यांच्या पश्चात पत्नी प्रियंका शंकर आणि मुलगी इंद्रजा शंकर असा परिवार आहे.
या दु:खद घटनेनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, “रोबो हे फक्त नाव आहे, पण माझ्यासाठी तू एक संपूर्ण व्यक्ती होतास. तू माझा छोटा भाऊ होतास. असं मला सोडून जाणं योग्य नाही.”
रोबो शंकर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील निवासस्थानी ठेवण्यात आलं असून आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार पार पाडले जाणार आहेत.
read also :https://ajinkyabharat.com/iphone-kharedisathi-gardi-usali/