कुटुंबीयांचे सरकारला मदतीचे आवाहन

अमेरिकेत भारतीय युवक ठार

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सांता क्लारा येथे स्थानिक पोलिसांनी केलेल्या गोळीबारात भारतातील तेलंगणाचा रहिवासी आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर मोहम्मद निजामुद्दीन (वय 30) याचा मृत्यू झाला आहे. ही घटना 3 सप्टेंबर 2025 रोजी घडली.

रूममेटशी वाद, पोलिसांचा गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, निजामुद्दीनचा रूममेटसोबत एअर कंडिशनरवरून वाद झाला. वाद चिघळून हाणामारी आणि चाकू काढण्यापर्यंत पोहोचला. शेजाऱ्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांनाही हात वर करण्यास सांगितले. रूममेटने आज्ञा पाळली, पण निजामुद्दीनकडून प्रतिसाद न आल्याने पोलिसांनी त्याच्यावर थेट चार गोळ्या झाडल्या. जागीच त्याचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांचे भावनिक आवाहन

निजामुद्दीन हा महबूबनगर (तेलंगणा) येथील रहिवासी होता. 2016 मध्ये तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. शिक्षण पूर्ण करून त्याने फ्लोरिडामध्ये नोकरी सुरू केली, त्यानंतर बढती मिळून तो कॅलिफोर्नियाला स्थायिक झाला होता.

त्याचे वडील मोहम्मद हसनुद्दीन यांनी संताप आणि दुःख व्यक्त करत भारत सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. “माझ्या मुलाचा मृतदेह तातडीने भारतात आणण्यासाठी मदत करावी,” असे त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना आवाहन केले.

संपर्क तुटला, नंतर धक्कादायक माहिती

कुटुंबीयांनी सांगितले की, गेल्या 10–15 दिवसांपासून त्यांच्याशी निजामुद्दीनचा संपर्क होत नव्हता. अखेर सोशल मीडियावर आणि ओळखीच्या लोकांकडून त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली. सध्या त्याचा मृतदेह स्थानिक रुग्णालयात ठेवण्यात आला असून, कुटुंबीयांनी केंद्र आणि राज्य सरकारला तो लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.

read also :https://ajinkyabharat.com/dunith-vellalegela-motha-push/